भावाच्या विरोध असतांनाही बहिणीने केला ड्रायव्हरसोबत प्रेमविवाह; संतापलेल्या भावाने रागाच्या भरात केलं भयानक कांड.

Spread the love

कल्याण:- वारंवार विरोध करूनही बहिणीने ड्रायव्हरसोबत लग्न केले त्यामुळे संतापलेल्या भावाने गुंड पाठवून बहिणीच्या पतीला बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. कल्याण रेल्वे स्थानकावर ही घटना घडली आहे.याप्रकरणी कल्याण रेल्वे पोलिसांनी मारहाण करणाऱ्या सात जणांविरोधात गुन्हा दाखल करत त्यांना अटक केली. तरुणीचा भाऊ सध्या फरार असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत. याप्रकरणाचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेशमधील बस्ती जिल्ह्यात अनुष्का वर्मा नावाची तरुणी आपल्या कुटुंबासोबत राहते.

या तरुणीचे खुदिराम चौधरी या तरुणाशी प्रेमसंबंध होते. खुदिराम हा कामानिमित्त कल्याणजवळील बनेली येथे राहतो आणि तो ड्रायव्हर म्हणून काम करतो. या दोघांनी सप्टेंबर 2023 मध्ये लपून प्रेमविवाह केला होता. या प्रेमविवाहबाबत कुटुंबात कोणालाही माहिती नव्हती. खुदिराम हा ड्रायव्हर असल्याने अनुष्काच्या कुटुंबीयांचा त्याला विरोध होता. 25 एप्रिल रोजी अनुष्का घरातून अचानक बेपत्ता झाली. अनुष्काच्या नातेवाईकांनी तिचा शोध सुरू केला. अनुष्का एका तरुणासोबत झाशीला गेली असून तिथून तिने कल्याणला जाण्यासाठी गोरखपूर एक्स्प्रेस पकडली असल्याची माहिती अनुष्काच्या कुटुंबियांना मिळाली.

अनुष्काच्या भावाने याबाबत नाशिक आणि मुंबई येथे राहणाऱ्या नातेवाईक आणि मित्रांना माहिती देत अनुष्काला परत आणा असे सांगितले. अनुष्काच्या भावाचे ३ मित्र नाशिकमधून गोरखपूर एक्स्प्रेसमध्ये घुसले. फोटोच्या आधारे त्यांनी एक्स्परेसमध्ये अनुष्काचा शोध घेतला. याच दरम्यान त्यांना अनुष्का दिसली. त्यांनी अनुष्काचा फोटो काढण्याचा प्रयत्न केला. मात्र याच वेळेला खुदिराम याने त्यांना फोटो काढताना पाहिले. खुदिरामने या तरुणांना फोटो का काढता याबाबत जाब विचारला तोपर्यंत ट्रेन कल्याण रेल्वे स्थानकावर पोहोचली होती. अनुष्काच्या भावाचे आणखी चार मित्र हे कल्याण रेल्वे स्थानकावर गोरखपूर एक्स्प्रेसची वाट बघत होते.

ट्रेन रेल्वे स्थानकावर पोहोचताच ६ ते ७ जणांनी अनुष्का आणि खोदिराम यांना घेरले. त्यांनी खुदिराम याला बेदम मारहाण केली आणि अनुष्काला आपल्या दिशेने खेचले. कल्याण रेल्वे स्थानकात हा प्रकार घडत होता याची माहिती कल्याण रेल्वे पोलिसांना मिळाली.कल्याण रेल्वे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मारहाण करणाऱ्या ७ जणांना ताब्यात घेतलं. आरोपींविरोधात गुन्हा दाखल करत पोलिसांनी त्यांना तात्काळ अटक केली. पोलिसांनी आरोपींची चौकशी केली असताना धक्कादायक माहिती समोर आली. भावानेच बहिणीच्या नवऱ्याला मारहाण करण्यासाठी या गुंडांना पाठवले होते. बहिणीने एका ड्रायव्हरसोबत लग्न केलं या रागातून तरुणीच्या भावानेच हे गुंड पाठवले आणि खुदिरामला मारहाण करत अनुष्काला पुन्हा घेऊन येण्यास सांगितले असल्याचे आरोपींनी पोलिसांना सांगितले.

हे पण वाचा

टीम झुंजार