खिडकीची लोखंडी जाळी वाकवून २ लाख ६३ हजार रुपयांची चोरी, एरंडोल शहरातील घटना.

Spread the love

एरंडोल :- खिडकीची लोखंडी जाळी वाकवून रोख रकमेसह,दोन मोबाईल आणि चांदीचे कडे असा सुमारे २ लाख ६३ हजार रुपयांचा ऐवज अज्ञात चोरट्यांनी
लांबवल्याची घटना काल (ता.७) मध्यरात्रीच्या सुमारास हॉटेल कृष्णा समोरील महाजन नगरात घडली. याबाबत माहिती अशी,की राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या हॉटेल कृष्णा समोरील महाजन नगरात मेहेरबाननाथ सिंधुनाथ सोलंकी हे पत्नी नगीनाबाई आणि मुले विशाल व गणपत यांचेसह दीड वर्षांपासून भाड्याच्या घरात आहेत.

मेहेरबाननाथ सोलंकी हे मुलांसह राजस्थान येथून लाल दगड आणून त्यापासून मुर्त्या बनवून त्याची विक्री करतात.काल (ता.७) रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास मेहेरबाननाथ व मुलगा विशाल हे मुर्त्या बनवण्याचे काम संपवून झोपले.पहाटे चार वाजेच्या सुमारास ते झोपेतून उठले असता त्यांना घराच्या मागील बाजूस असलेल्या खिडकीची लोखंडी जाळी वाकलेली दिसली.तसेच खिडकीच्या बाहेर घरातील कपडे अस्ताव्यस्त फेकलेले
दिसले.मेहेरबाननाथ व परिवारातील सदस्यांनी स्वयंपाक घरात जाऊन पाहिले असता त्याठिकाणी असलेल्या दोन लोखंडी पत्राच्या पेट्या दिसून आल्या नाहीत.

तसेच दोन ओप्पो व एक विवो कंपनीचे मोबाईल देखील अज्ञात चोरट्यांनी लांबवल्याचे दिसले.घरात चोरो झाल्याचे दिसताच मेहेरबाननाथ सोलंकी यांनी आजूबाजूला राहणारे रहिवासी व घरमालकाच्या मुलास बोलावले सर्वांनी चोरीस गेलेल्या वस्तू शोधल्या असता त्या आढळून आल्या नाही.अज्ञात चोरट्याने मेहेबाननाथ सोलंकी यांच्या घरातून १ लाख ९८ हजार रुपये रोख,पंधरा हजार रुपये किमतीचे चांदीचे कडे आणि पन्नास हजार रुपये किमतीचे मोबाईल असा सुमारे २ लाख ६३ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला.

पोलीस निरीक्षक सतीश गोराडे,उपनिरीक्षक शरद बागल यांनी घटनास्थळी भेट देवून पाहणी केली.याबाबत
मेहेरबाननाथ सोलंकी यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून उपनिरीक्षक शरद बागल तपास करीत आहेत. दरम्यान दगड फोडून मुर्त्या घडवणा-या परप्रांतीय मजुराच्या घरात चोरी झाल्यामुळे सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण झाले असून चोरट्यांना पकडण्याचे आव्हान पोलिसांसमोर उभे राहिले आहे.

हे पण वाचा

टीम झुंजार