संजय चौधरी मुख्य संपादक झुंजार न्युज. एरंडोल तालुक्यातील जिरायती क्षेत्राबरोबरोबरच बागायती क्षेत्र देखील जुप (मक्ता) अथवा हिश्याने देण्याकडे शेतकर्यांचा कल वाढला असून, उत्पादन खर्चापेक्षा लागवड खर्च अधिक झाल्याचे शेतकर्यांचे म्हणणे आहे. बेमोसमी पाऊस, अवकाळी, गारपीट, कमी पर्जन्यमान या नैसर्गिक संकटासोबतच मानवनिर्मित संकटांचा सामना शेतकर्यांना करावा लागत आहे. त्यातच उत्पादन खर्च अधिक तर उत्पन्न कमी असा दृष्टचक्रात शेती व्यवसाय सापडलाय. वाढत्या महागाईत शेतीकामासाठी लागणार्या सालगड्यांच्या मजुरीने लाखांचा टप्पा पार केला आहे.
ग्रामीण भागात मजुरांची संख्या भेडसावत आहे. शेतकरी बैलबारदाना मोडून शेती जुपने (मक्त्याने) अथवा हिश्याने देण्याकडे पुढे सरसावले आहेत. शेतकर्यांचे नववर्ष हे गुढीपाडव्याला असते. याच दिवशी सालगडी ठेवणे, शेती वाट्याने देणे असे शेतीचे वार्षिक नियोजन केले जाते, शेती संदर्भातील नियोजन गुढीपाडव्यालाच केले जाते. परंतु गेल्या काही वर्षांपासून बी-बियाणे, रासायनिक खते यांचे वाढते दर, मजूर टंचाई, रोजगाराची वाढती स्पर्धा, लागवड खर्चात मोठ्या प्रमाणात झालेली वाढ, सालगड्यांची वाढलेली मजुरी, निसर्गावर आधारित शेती, विविध नैसर्गिक संकटे आदी अनेक समस्यांच्या दृष्टचक्रात शेती सापडल्याने शेतकरी चिंतित असल्याचे चित्र आहे.
सर्व समस्यांना वैतागून अनेक शेतकरी शेती हिश्याने अथवा मक्त्याने देण्याचा प्रयत्न करीत असल्याचे दिसत आहे. सालगडांची मजुरी वाढत आहे. परंतु शेतीतील उत्पन्नात पाहिजे तशी वाढ होत नसल्याचे शेतकर्यांचे म्हणणे आहे. दररोज किमान 400 रुपये मजुरी मिळावी, अशी मजुरांची अपेक्षा आहे, तर दुसरीकडे शेतकरी संकटात सापडला आहे. हाती पैसा नसल्याने आपल्या पाळीव जनावरांना बाजाराचा रस्ता दाखवला जात आहे. गोठ्यातील बैलजोडी विकून शेती ट्रॅक्टरच्या मदतीने करण्याचा प्रयोगही अनेकजण करीत आहेत. शेती कामात ट्रॅक्टरचा वापर वाढल्याने दिसून येत आहे.
जास्त पैसे खर्च झाले तरी शेती कामे लवकर होतात म्हणून तंत्रज्ञानाचा वापर वाढला आहे. दुष्काळी परिस्थितीमुळे म्हैस, गाई, वासरे, कालवडी, गोर्हे यांची बाजारात कवडीमोल दरात विक्री करताना शेतकरी दिसत आहेत. अनेक वर्षांपासून सततच्या दुष्काळामुळे तालुक्यातील पशुधनात घट होताना दिसून येत आहे. पूर्वी ज्यांच्याकडे एक किंवा दोन बैलजोड्या, गाई, म्हशी जनावरे जास्त तो शेतकरी श्रीमंत समजला जाई. परंतु अलीकडे मजुरी वाढल्याने, चाराटंचाई, पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष यामुळे जनावर कमी करण्याचा सपाटा शेतकरी लावत असल्याचे चित्र आहे.
त्यामुळे एखादी बैलजोडी, एखादी गाय-म्हैस दुधासाठी ठेवतानाही शेतकर्यांच्या नाकीनऊ येत असल्याचे चित्र आहे. मागील 4 ते 5 वर्षांपासून सततचा अवकाळी पाऊस, गारपीट यामुळे शेती पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. एका संकटातून शेतकरी बाहेर पडत नाही, तोवर दुसरे संकट तयार असते. भाव वाढेल या आशेने मागील वर्षाचा कापूस अजूनही शेतकर्याकडे पडला आहे. एकंदरीत शेतकरी सर्व बाजूने संकटांनी वेढला गेला असल्याने शेती करणे जिकिरीचे झाले आहे.
हे पण वाचा
- भाजीपाला घेऊन घरी जात असलेल्या महिलेस मारहाण करून गळ्यातील मंगळसूत्र अन् मोबाइल पतीनेच पळवले, काय आहे प्रकरण वाचा.
- एरंडोल तालुक्यातील रिंगणगाव येथे चौदा वर्षीय अल्पवयीन बालकाची गळा चिरून हत्या; संतप्त ग्रामस्थांचा राष्ट्रीय महामार्गावर आंदोलन.
- 33/11 केव्ही क्षमतेचा उपकेंद्राचे शिरसमणी येथे आमदार मा.अमोलदादा पाटील यांच्या शुभहस्ते भुमीपुजन….
- चाळीसगाव तालुक्यात वीज पडून तिघांचा मृत्यू, एकजण जखमी.
- एरंडोल चे माजी नगराध्यक्ष अपघातात गंभीर जखमी; माजी नगरसेविका पत्नी कल्पना महाजन यांनी केली घातपात असल्याची तक्रार.