हुबळी (कर्नाटक) :- शहरामध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. हुबळी-धारवाड महानगरपालिकेतील काँग्रेसचे नगरसेवक निरंजन हिरेमठ यांची मुलगी नेहा (वय – 21) हिचा कॉलेजमध्ये दिवसाढवळ्या खून करण्यात आला.एकतर्फी प्रेमातून हा प्रकार घडला असून आरोपीने मुलीवर चाकूने सपासप वार केल्याचे समोर आले आहे. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेजही सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. याप्रकरणी आरोपी फयाज (वय – 23) याला अटक करण्यात आली आहे.नेहा एमसीएच्या पहिल्या वर्षाला शिकत होती.
आरोपी फयाज हा देखील नेहाच्याच कॉलेजमध्ये शिक्षण घेत होता. त्याचे वडील शिक्षक असून पहिल्या वर्षात नापास झाल्यामुळे गेल्या 6 महिन्यांपासून त्याने कॉलेजमध्ये पाऊल ठेवले नव्हते. गुरुवारी तो चाकू घेऊन कॉलेजमध्ये आला आणि त्याने नेहाला गाठत तिच्यावर सपासप वार करण्यास सुरुवात केली. नेहा गतप्राण होईपर्यंत त्याने तिच्यावर वार केले. त्यानंतर त्याने तिथून पळून जाण्याचा प्रयत्न केला, मात्र स्थानिकांनी पाठलाग करून त्याला पकडले.चाकूचे सपासप वार झाल्याने नेहा घटनास्थळावर रक्ताच्या थारोळ्यात पडली होती.
कॉलेजमधील इतर विद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांनी तिला तात्काळ रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारांपूर्वीच डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. यानंतर तिचा मृतदेह शवविच्छेदनासाठी केम्पेगौडा इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस रुग्णालयामध्ये नेण्यात आला.दरम्यान, पोलिसांनी या प्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल केला असून आरोपी फयाज याला अटक केली आहे. त्याची चौकशी सुरू आहे. या घटनेनंतर भाजपने कर्नाटकमध्ये कायदा व सुव्यवस्थेचा बोजरावा उडाल्याचा आरोप केला आहे.
स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, फयाज गेल्या काही दिवसांपासून नेहाचा पाठलाग करत होता आणि तिला त्रासही देत होता. नेहावर त्याचे एकतर्फी प्रेम होते. मात्र नेहाने त्याला नकार दिल्याने त्याने टोकाचे पाऊल उचलत तिचा निर्घृणपणे खून केला. या घटेनंतर भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने जोरदार निषेध आंदोलन करण्यात आले असून नेहाचा खून करणाऱ्याला कठोर शिक्षा देण्याची मागणी यावेळी करण्यात आली.
हे पण वाचा
- भाजीपाला घेऊन घरी जात असलेल्या महिलेस मारहाण करून गळ्यातील मंगळसूत्र अन् मोबाइल पतीनेच पळवले, काय आहे प्रकरण वाचा.
- एरंडोल तालुक्यातील रिंगणगाव येथे चौदा वर्षीय अल्पवयीन बालकाची गळा चिरून हत्या; संतप्त ग्रामस्थांचा राष्ट्रीय महामार्गावर आंदोलन.
- 33/11 केव्ही क्षमतेचा उपकेंद्राचे शिरसमणी येथे आमदार मा.अमोलदादा पाटील यांच्या शुभहस्ते भुमीपुजन….
- चाळीसगाव तालुक्यात वीज पडून तिघांचा मृत्यू, एकजण जखमी.
- एरंडोल चे माजी नगराध्यक्ष अपघातात गंभीर जखमी; माजी नगरसेविका पत्नी कल्पना महाजन यांनी केली घातपात असल्याची तक्रार.