एरंडोल :- शहराबाहेर असलेल्या नवीन वसाहतींमधील गटारी व नवीन पाणीपुरवठा योजनेचे कामे लवकर पूर्ण करण्यात यावेत अशी मागणी रहिवाशांनी केली आहे. नवीन वसाहतींमध्ये घरांच्या प्रवेशद्वाराजवळ गटारींसाठी खोदकाम करण्यात आल्यामुळे तसेच नवीन पाणी पुरवठा योजनेसाठी ठिकठीकाणी रस्ते खोदण्यात आल्यामुळे रहिवाशांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे.शहराचा विस्तार वेगाने होत असून अनेक नवीन वसाहती निर्माण होत आहेत.पालिकेचा हजारो रुपयांचा कर भरणारे रहिवासी मुलभूत सोयी व
सुविधांपासून वंचित राहत आहेत.
शहराबाहेर व पालिका हद्दीत समावेश करण्यात आलेल्या नवीन वसाहतींमध्ये नवीन गटार बांधकाम व नवीन पाणी पुरवठा योजनेचे कामे सुरु आहेत.गटारीचे कामे वेगाने सुरु आहेत तर पाणीपुरवठा योजनेचे काम अत्यंत संथगतीने सुरु आहे.नवीन पाणी पुरवठा योजनेच्या कामासाठी सर्व रस्ते खोदण्यात आले आहेत तसेच गटारींच्या कामांसाठी देखील घरांच्या प्रवेशद्वाराजवळच खोदकाम करण्यात आले आहे. सद्यस्थितीत पावसाळा सुरु असल्यामुळे नवीन वसाहतींमध्ये सर्वत्र चिखल व गारा झाल्यामुळे रहिवासी त्रस्त झाले आहेत.गटारीच्या कामासाठी प्रवेशद्वाराजवळच खड्डे खोदण्यात आल्यामुळे रहिवाशांना घरात ये जा करतांना तारेवरची कसरत करावी लागत आहे.
याचा सर्वाधिक त्रास ज्येष्ठ नागरिक,महिला व लहान बालकांना सहन करावा लागत आहे.गटारींचे कामे सुरु असल्यामुळे सांडपाणी वाहण्यात अडचण निर्माण होत असून परिसरातच सांडपाणी तुंबत असल्यामुळे सर्वत्र दुर्गंधी पसरून डासांच्या प्रमाणात वाढ झाल्यामुळे रहिवाशांच्या आरोग्याची समस्या निर्माण होण्याची भीती आहे. तुंबलेल्या सांडपाण्यामध्ये डुकरे व मोकाट कुत्र्यांचा वावर मोठ्या प्रमाणावर वाढला आहे.नवीन पाणी पुरवठा योजनेच्या कामासाठी नवीन वसाहतींसह शहरात देखील पक्के रस्ते खोदुन त्यामध्ये पाईप टाकण्यात आले आहेत मात्र पाईप टाकल्यानंतर रस्ता योग्य पद्धतीने दाबण्यात न आल्यामुळे खड्ड्यांमध्ये मोटारसायकली अडकत आहे.नवीन पाणी पुरवठा योजनेचे काम अत्यंत संथ गतीने सुरु असतांना पालिका प्रशासनाने मात्र याकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष केले आहे.
नवीन वसाहतींमधील मोकळ्या जागांवर पालिकेने ठिकठीकाणी आकर्षक सर्वसोयींनीयुक्त सार्वजनिक उद्यांनांची निर्मिती केली आहे.सकाळ व सायंकाळी नागरिक उद्यानांमध्ये फिरण्यासाठी जात असतात मात्र गटार व पाणी पुरवठा योजनेच्या कामांमुळे फिरण्यासाठी जाता येत नसल्याची खंत नागरिकांनी व्यक्त केली. मुलांसाठी उद्यानांमध्ये विविध प्रकारच्या खेळाचे साहित्य लावले आहे मात्र रस्त्यांवर सर्वत्र गारा व चिखल असल्यामुळे मुलांना खेळण्यांचा आनंद घेण्यापासून वंचित रहावे लागत आहे.याबाबत पालिका प्रशासनाने त्वरित दखल घेवून गटार व नवीन पाणी पुरवठा योजनेचे कामे लवकर पूर्ण करण्याच्या सुचना ठेकेदारास द्याव्यात अशी मागणी महिला वर्गातून केली जात आहे.
हे पण वाचा
- न्यू इंग्लिश मीडियम स्कूल ची आषाढी वारी एरंडोल शहरात संपन्न
- भडगावमध्ये मोहरम उत्सव उत्साहात संपन्न.!!!सामाजिक ऐक्याचे सुंदर चित्र.
- एरंडोल शहरातील भटक्या व पिसाळलेल्या कुत्र्यांच्या तत्काळ बंदोबस्तासाठी दिले निवेदन.
- एरंडोल येथील गांधीपुरा भागात वृद्ध महिलेचे हातपाय बांधून चाळीस हजार रुपयांची लुट.
- अंजनी नदीचे अस्तित्व धोक्यात,प्रशासनाचे स्वच्छतेकडे दुर्लक्ष; नदीला आले गटारगंगेचे स्वरूप, सार्वजनिक शौचालय व स्वच्छतागृहाचे दुर्गंधीयुक्त सांडपाणी पालिकेने सोडले नदीत.