चाळीसगाव :- भरधाव वेगाने जाणाऱ्या कंटेनरने तीन वर्षाच्या बालकाला चिरडल्याची घटना तळेगाव (ता. चाळीसगाव) येथे आज सकाळी पावणे अकराच्या सुमारास घडली. या घटनेनंतर संतप्त ग्रामस्थांनी कंटेनरची तोडफोडकरीत रस्त्यावर गतीरोधकाच्या मागणीसाठी रास्ता रोको आंदोलन केले.यामुळे चाळीसगाव- नांदगाव रस्त्यावरील वाहतूक रात्री उशिरापर्यंत ठप्प झाली होती. पोलिस अधिकाऱ्यांसह राष्ट्रीय महामार्गच्या अधिकाऱ्यांनी तळेगावकरांशी चर्चा करून त्यांच्या भावना समजून घेतल्या.
मात्र, रात्री उशिरापर्यंत या रस्त्यावरील वाहतूक सुरु झालेली नव्हती. याप्रकरणी ग्रामीण पोलिसात कंटेनर चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत प्रशांत गोरे (वय ३०, रा. तळेगाव, ता. चाळीसगाव) यांनी फिर्याद दिली, की त्यांचे काका सचिन जगन्नाथ गोरे यांचा मुलगा जीवन (वय ३) हा त्याचे बाबा जगन्नाथ गोरे यांच्यासोबत मंगळवारी (ता.१३) सकाळी पावणेअकराच्या सुमारास बस स्थानकावर आलेला होता. आजोबा त्याला चॉकलेट घेऊन देत असताना जीवन रस्त्याच्या बाजूला उभा होता. त्याचवेळी हिरापूर रोडकडून भरधाव वेगाने येणाऱ्या कंटेनरची (क्रमांक- के. ए. ४४ ए १९७५) त्याला जोरदार धडक बसली. ज्यात क्लीनर बाजूच्या पुढील चाकाखाली जीवन दाबला गेला. ग्रामस्थांनी जीवनला कंटेनरखालून काढून तळेगाव आरोग्य केंद्राच्या रुग्णवाहिकेतून तत्काळ चाळीसगावला ग्रामीण रुग्णालयात आणले असता, डॉक्टरांनी तपासून तो मयत झाल्याचे सांगितले.
ग्रामस्थांचा संताप
अपघात घडताच संतप्त ग्रामस्थांनी कंटेनरचालक लक्ष्मण फोरन सिंग (रा. बढा खुर्द कारस, जि. अलिगड, उत्तरप्रदेश) याला चांगलाच चोप दिला. यावेळी मोठी जमाव जमल्याने त्यांनी कंटेनरची तोडफोड केली. या घटनेची माहिती कळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.संतप्त झालेले ग्रामस्थ कोणाचेही काही ऐकण्याच्या मनःस्थितीत नव्हते. जोपर्यंत या रस्त्यावर गतिरोधक टाकले जात नाही, तोपर्यंत आम्ही एकही वाहन रस्त्याने जाऊ देणार नाही, अशी भूमिका घेतली. त्यामुळे नांदगाव रस्त्यावर दूरपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.
उशिरापर्यंत तणाव
रात्री उशिरापर्यंत तळेगावात तणावाचे वातावरण होते. पोलिसांनी राष्ट्रीय महामार्गच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधून गतिरोधक टाकण्यासंदर्भात चर्चा केली. सध्या कन्नड घाटातून अवजड वाहनांची वाहतूक बंद असल्यामुळे नांदगावमार्गे मोठ्या प्रमाणावर वाहतूक सुरु आहे.तळेगावला रस्त्याच्या पलीकडे शाळा, दवाखाना असतानाही गतिरोधक टाकलेले नाही. ग्रामपंचायतीने याबाबत ठराव देखील यापूर्वीच दिलेला आहे. मात्र, तरीही दखल घेतली जात नसल्याचे सांगत आजच्या अपघातामुळे ग्रामस्थ संतप्त झाले होते. रात्री उशिरापर्यंत पोलिस गावात थांबून होते.
चूलच पेटली नाही
जीवन गोरे या बालकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याच्या घटनेमुळे संपूर्ण तळेगावात शोककळा पसरली आहे. गावातील एकही घरात चूल पेटली नाही. ग्रामस्थांनी केलेल्या रास्ता रोको आंदोलनात सर्व ग्रामस्थ सहभागी झाले होते. अपघाताची माहिती सांगताना ग्रामस्थांना अक्षरशः अश्रू अनावर झाले होते.
हे पण वाचा
- यावल तालुक्यात शेत शिवारात कापूस वेचणी करतांना सर्पदंश झालेल्या ३० वर्षीय महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू.
- आजचे राशी भविष्य रविवार दि. २४ नोहेंबर २०२४
- जळगाव ग्रामीण मतदार संघातून शिवसेना महायुतीचे गुलाबराव पाटील यांच्या दणदणीत विजय.
- एरंडोल विधानसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार अमोलदादा पाटील यांचा एकतर्फी विजय,५६ हजार ३३२ मतांनी दणदणीत विजय.
- Viral Video:एका कारचालकास रुग्णवाहिकेला रस्ता न देणे पडले महागात, पोलिसांनी शिकवला धडा, लायसन्स केलं रद्द अन् केला लाखो रुपये दंड.