यवतमाळ : राळेगाव शहरापासून दोन किलोमिटर अंतरावरील सोनुर्ली शिवारातील जंगलामध्ये शनिवारी (ता. १७) दुपारी महिलेचा संशयास्पद स्थितीत मृतदेह आढळला. याची माहिती मिळताच राळेगाव पोलिसांसह वरिष्ठ अधिकार्यांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनेचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीकरिता रुग्णालयात पाठविण्यात आला. तपासचक्रे वेगात फिरवून पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या. आरती शरद कोवे ( वय ३६, रा. पिंपरी दु.) असे मृत महिलेचे नाव आहे. तर गणेश येपारी, असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.
राळेगाव येथे शुक्रवारी आरती कोवे बाजार घेण्याकरिता गेली होती. रात्री उशिरापर्यंत ती घरी परतलीच नव्हती. शेवटी शनिवारी दुपारी सोनुर्ली जंगलात महिलेचा मृतदेह परिसरातील नागरिकांच्या निदर्शनास पडला. याची माहिती राळेगाव पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी लगेच घटनास्थळी धाव घेतली. तेव्हा मृतदेह हा आरती कोवे हिचाच असल्याची बाब समोर आली. पोलिसांनी घटनेचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीकरिता रुग्णालयात पाठविला.त्यावेळी तिच्या शरीरावर तीक्ष्ण हत्याराने वार केल्याचे दिसून आले.
तसेच आजूबाजूला काही आक्षेपार्ह वस्तू पोलिसांना सापडल्या. या घटनेचे गांभीर्य ओळखून उपविभागीय पोलिस अधिकारी रामेश्वर वैजाने, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक ज्ञानोबा देवकते यांनीसुद्धा घटनास्थळी भेट देवून पाहणी केली. प्रकरण चिघळू नये म्हणून पोलिसांनी तपासकार्य वेगाने फिरविले.त्यात संशयित आरोपी म्हणून गणेश येपारी याला ताब्यात घेतले. त्या विवाहित महिलेसोबत प्रेमसंबंध असल्याची बाब तपासात आरोपीने पोलिसांना सांगितली.
आणि घटनेच्या दिवशी मृत महिलेने गणेशला पाच हजार रुपयांची मागणी केली होती. सातत्याने होणार्या पैशाच्या मागणीमुळेच हा खून केल्याचेही आरोपीने पोलिसांना सांगितले. त्यावरून आरोपी गणेश येपारी याच्या विरोधात राळेगाव पोलिस ठाण्यात खुनासह अॅट्रॉसिटी कलमांतर्गत गुन्हे नोंद केले. या प्रकरणाचा तपास ठाणेदार सीताराम म्हेत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली अजय वाढवे, अमोल मुडे, धनराज हाके करीत आहे.
हे पण वाचा
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






