वीस हजार रुपयात विकले चिमुकल्यास,सर्वांनी लाचार बापाला लुटले.
कुशीनगर :- मानवतेला लाजवेल अशी घटना उत्तर प्रदेशच्या कुशीनगर भागातील आहे. उत्तर प्रदेशला कितीही विकसित घोषित करण्याचा योगी आदित्यनाथ यांनी प्रयत्न केला, तरी बुडाखालचे काही झाकत नाही. कुशीनगर येथील बरवापट्टी या परिसरातील दशावा भेडीहारी गावात राहणाऱ्या एका मजुराला पत्नी प्रसूत झाल्यानंतर तिला दवाखान्यातून सोडवण्यासाठी दोन वर्षाच्या मुलाला विकण्याची वेळ आणली. एका खाजगी रुग्णालयात बायकोची सामान्य प्रसूती झाली. मात्र बाळाच्या बापाची एवढी लूट झाली की, बायकोला सोडवण्यासाठी त्याच्याकडे पैसेच उरले नाहीत.
अखेर नवजात बालक आणि आपल्या पत्नीला सोडवण्यासाठी त्यांनी आपल्याच दोन वर्षाच्या मुलाला चक्क विकले. बरवापट्टी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दशावा भेडीहारी या गावात राहणाऱ्या हरीश पटेलची ही कहाणी! त्याची पत्नी लक्ष्मीदेवी ही गर्भवती होती. तिला प्रसूतीच्या कळा सुरू झाल्या आणि गावातील एका खाजगी रुग्णालयात तिला दाखल करण्यात आले. तिथे तिची सामान्य प्रसूती झाली, मात्र रुग्णालयाने चार हजार रुपयांची मागणी केली.पैसे देत नाही तोपर्यंत आई आणि मुलाला सोडणार नाही असेही दवाखान्याने सांगितले. हरीश पटेलला नव्या बाळासह सहा मुले आहेत.
तो घाईगडबडीने एका महिलेकडे गेला आणि तिला आपल्या पाचव्या मुलाला विकण्याची विनंती केली. हे मूल विकत घेण्याची एकाने तयारी दाखवली, मात्र त्यासाठी हरीश पटेल यांच्या स्टॅम्प पेपरवर सह्या व ऑफिडेविट घेण्यात आले, तसेच मूल दत्तक दिले आहे, अशा स्वरूपाची बतावणी करण्यात आली. या बदल्यात त्याला वीस हजार रुपये मिळाले. रुग्णालयात चार हजार रुपये भरले आणि बायकोला घरी घेऊन गेला. बायकोने पाचव्या मुलाची विचारणा केली. तेव्हा तिला सारी कहाणी कळाली. अर्थात या घटनेची गावात चर्चा सुरू झाली आणि गावकऱ्यांनी ही माहिती एका पोलिसाला दिली.
मग एक हवालदार हरेशच्या घरी आला. त्याने उलट मुलाची विक्री केली म्हणून हरेश पटेल यालाच कारवाई करण्याची धमकी दिली. त्यावर हरीश पटेलने त्याला पाच हजार रुपये दिले. मग मात्र गावकरी चिडले आणि गावकऱ्यांनी ही बाब पोलीस अधीक्षकांच्या कानावर घातली.ही घटना कळताच जिल्हाधिकारी उमेश मिश्रा आणि कुशीनगर चे पोलीस अधीक्षक संतोष कुमार मिश्रा हे दोघेही हरीश पटेल च्या घरी पोहोचले. त्यांनी सर्व माहिती घेतली आणि गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया करण्यासाठी सूचना दिल्या. त्यानंतर तपासातून हे मूल हरीश पटेल याला परत देण्यात आले आहे, मात्र पैशाअभावी बाळासह महिलेला ओलीस ठेवणाऱ्या रुग्णालयाची चौकशी करत पोलिसांनी रुग्णालय चालकाला देखील अटक केली.
काँग्रेस नेत्याने सरकारवर आरोप केला
मुलाची विक्री झाल्याची माहिती मिळताच काँग्रेसचे माजी विधानसभा अध्यक्ष आणि माजी आमदार अजय कुमार लल्लूही घटनास्थळी पोहोचले. माजी आमदाराने सीएमओ सुरेश पटारिया यांना खडे बोल सुनावले, त्यानंतर सीएमओ घटनास्थळावरून पळून गेले. काँग्रेसचे माजी अध्यक्ष अजय कुमार लल्लू यांनी सरकारवर अपयशी ठरल्याचा आरोप केला.
हे पण वाचा
- भरधाव वाहनाच्या ताबा सुटल्याने रस्त्याच्या कडेला उभे असलेल्या ३ मोटरसायकलींना चिरडलं ५ जणांचा मृत्यू एकाची प्रकृती चिंताजनक.
- डॉ.संभाजीराजे पाटील यांचा वाढत्या प्रतिसादेला जनतेची साथ
- मनसेला खिंडार – जिल्हा उपाध्यक्षांसह कार्यकर्ते शिवसेनेत दाखल नशिराबाद, चिंचोली व धानवड येथील कार्यकर्त्यांनी स्वीकारले गुलाब भाऊंचे नेतृत्व
- जळगाव लोकसभेच्या महिला आघाडीच्या समन्वयकपदी शितल चिंचोरे यांची निवड; शिवसेना नेते गुलाबराव पाटील यांच्या हस्ते झाला सत्कार !
- आजचे राशी भविष्य शनीवार दि. २ नोहेंबर २०२४