कोल्हापूर : डोक्यात हातोडीचे घाव घालून गंभीर जखमी झालेल्या पत्नीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही घटना सोमवारी मध्यरात्री पुलाची शिरोली परिसरात घडली. पत्नीवर हल्ला करून पतीने पंचगंगा नदीत उडी घेतली होती. याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, सागर गोपाळ कोळवणकर (वय ३५ ) हा शिरोलीतील कोरगावकर कॉलनी येथे एका भाड्याच्या घरात पत्नी मनीषा आणि दोन मुलासह राहतो. सोमवारी मध्यरात्री सागर याने पत्नी मनीषाच्या डोक्यात हातोडीचे घाव घातले.
अचानक झालेल्या हल्ल्यामुळे मनीषा किंचाळत उठली. त्यामुळे घरातील सगळे जागे झाले. व गावातील नागरिकांनीही सागरच्या घराकडे धाव घेतली. त्यानंतर घटनास्थळावरून पळून जाणाऱ्या सागरला शेजारील नागरिकांनी पकडून ठेवत शिरोली एमआयडीसी पोलिसांच्या स्वाधीन केले. त्यानंतर ग्रामपंचायतीच्या रुग्णवाहिकेतून जखमी मनीषाला कोल्हापुरातील सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर पोलिसांनी सागरला ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला असता त्याने बेशुद्ध पडण्याचे नाटक केले.
त्यामुळे पोलिसांनी त्यालाही अटक न करता सीपीआरमध्ये दाखल केले. त्यानंतर सागरने पहाटेच्या सुमारास सीपीआरमधून पळ काढला. त्यानंतर त्याने बावडा मार्गे शिये पंचगंगा नदीच्या पुलावरून उडी मारल्याचे काही नागरिकांनी पाहिले. त्याने जीवन संपविल्याचा संशय व्यक्त केला जात असून पोलिसांकडून त्याचा शोध सुरू आहे. सागर कोळवणकर हा भुदरगड तालुक्यातील शेळोली येथील मुळचा रहिवासी होता.
नऊ वर्षांपासून नोकरीच्या निमित्ताने पुलाची शिरोली येथे रहात होता. त्याची पत्नी मनीषाही शिरोली एमआयडीसीमध्ये नोकरी करत होती. त्यांना दोन मुले असून पंधरा वर्षाची मुलगी तर तेरा वर्षाचा मुलगा आहे. मुलगी नववीत तर सातवीत शिकत आहेत. बापाच्या अशा भुमिकेने सारे कुटुंब उद्ध्वस्त झाले असून दोन मुलांचे भवितव्य कोमेजून गेले आहे.
हे पण वाचा
- भरधाव वाहनाच्या ताबा सुटल्याने रस्त्याच्या कडेला उभे असलेल्या ३ मोटरसायकलींना चिरडलं ५ जणांचा मृत्यू एकाची प्रकृती चिंताजनक.
- डॉ.संभाजीराजे पाटील यांचा वाढत्या प्रतिसादेला जनतेची साथ
- मनसेला खिंडार – जिल्हा उपाध्यक्षांसह कार्यकर्ते शिवसेनेत दाखल नशिराबाद, चिंचोली व धानवड येथील कार्यकर्त्यांनी स्वीकारले गुलाब भाऊंचे नेतृत्व
- जळगाव लोकसभेच्या महिला आघाडीच्या समन्वयकपदी शितल चिंचोरे यांची निवड; शिवसेना नेते गुलाबराव पाटील यांच्या हस्ते झाला सत्कार !
- आजचे राशी भविष्य शनीवार दि. २ नोहेंबर २०२४