नागपूर : लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार केल्यानंतर ती गर्भवती होती. बाळाला जन्म देत, त्याच्या संगोपनासाठी अल्पवयीन मुलगी देहव्यापाराच्या व्यवसायात ओढल्या गेल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.याप्रकरणी अजनी पोलिसांनी प्रियकरास अटक केली असून पोक्सोसह विविध कलमानुसार गुन्हा दाखल केला आहे. सर्वेश सुशील रामटेके, असे अटकेतील प्रियकराचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महिन्याभरापूर्वी सामाजिक सुरक्षा विभागाच्या पथकाने खरबीतील मैत्री विहारनगर परिसरात छापा टाकून देहव्यापार उघडकीस आणला.
या कारवाईत पथकाने दोन अल्पवयीन मुलीची सुटका करीत, ऐश्वर्या उर्फ आशू गजानन राऊत (वय २१) हिला अटक केली होती. दरम्यान नंदनवन पोलिसांनी या मुलींची साक्ष नोंदविली असता, त्यातील एका मुलीने आपली आपबिती सांगितली. त्यात तिची सर्वेश सोबत ओळख झाली. याशिवाय मैत्रीतून प्रेम फुलले. त्यातून त्याने तिच्यावर अत्याचार केला. काही दिवसात ती गर्भवती झाल्याने तिने लग्नाची गळ घातल्यावर त्याने नकार दिला, त्यानंतर तिने मुल जन्माला घालण्याचा निर्णय घेतला. त्याचे पालनपोषण करण्यासाठी ती देहव्यवसायात आल्याची माहिती समोर आली.
आरोपीला तीन दिवसांची कोठडी
काही दिवसांपूर्वी हा गुन्हा अजनी पोलिसांकडे वर्ग करण्यात आला. वरिष्ठ पोलिस निरीक्षक नितीनचंद्र राजकुमार यांच्या नेतृत्वात पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. सर्वेशला अटक करून त्याला न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्याची तीन दिवसांसाठी पोलिस कोठडीत रवानगी केली असून पोलिस तपास करीत आहेत.