सुरजपूर (छत्तीसगड) :- हेड कॉन्स्टेबलची पत्नी आणि त्याच्या मुलीची हत्या केल्याची धक्कादायक घटना छत्तीसगडच्या सूरजपूरमध्ये घडली आहे. यानंतर संतप्त झालेल्या जमावाने आरोपी काँग्रेस नेते कुलदीप साहू याचे घर नेहमीप्रमाणे पेटवून दिले.तसेच एसडीएमलाही मारहाण केली. त्यामुळे संतप्त जमावाचा उद्रेक पाहून एसडीएम आणि त्यांचे सुरक्षा कर्मचारी जीव आपला जीव वाचवण्यासाठी पळताना दिसले.
मिळालेल्या माहितीनुसार, सुरजपूर जिल्ह्यात तैनात असलेल्या हेड कॉन्स्टेबल तालिब शेख यांच्या पत्नी आणि मुलीची धारदार शस्त्राने हत्या करण्यात आली आहे. आरोपी काँग्रेस नेते कुलदीप साहू याने घरात घुसून हा गुन्हा केला आणि त्यानंतर हेड कॉन्स्टेबलच्या पत्नी व मुलीचे मृतदेह घरापासून 5 किलोमीटर अंतरावर असलेल्या शेतात फेकून दिले. अर्धनग्न अवस्थेत मृतदेह आढळून आले. यानंतर कदारमध्ये पळून जाणाऱ्या आरोपीला पकडण्यासाठी पोलिसांनी पाठलाग केला. यावेळी कुलदीप साहू याने पोलिसांवर गोळीबार केला. त्यामुळे पोलिसांनीही प्रत्युत्तरात गोळीबार केला.
मात्र आरोपी पळून जाण्यात यशस्वी झाला.हेड कॉन्स्टेबलच्या पत्नी आणि मुलीची हत्या झाल्यानंतर सूरजपूरमधील संतप्त झालेल्या जमावाने शहर बंद पाडले. यावेळी जमावाने आरोपी कुलदीप साहूच्या घर आणि गोदामाबाहेर उभ्या केलेल्या वाहनांना आग लावली. तसेच संतप्त जमावाने आरोपीच्या घरावर देखील हल्ला करत त्याचे आग लावली. मात्र घटना घडण्यापूर्वीच आरोपीचे कुटुंबीय कुठेतरी निघून गेले होते. यानंतर संतप्त जमावाने घटनास्थळी उपस्थित असलेल्या एसडीएमलाही मारहाण करण्याचा प्रयत्न केला. तणावाची परिस्थिती पाहता शहरात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. त्यामुळे संपूर्ण सूरजपूरचे छावणीत रूपांतर झाल्याचे पाहायला मिळाले.
दरम्यान, सूरजपूर कोतवाली पोलीस ठाण्यात तैनात घनश्याम सोनवाणी हे दुर्गा विसर्जनावेळी ड्युटीवर होते. ते आपली ड्युटी संपवून चहाच्या दुकानात चहा पीत असताना त्यांचा कुलदीप साहूसोबत वाद झाला. त्यानंतर रागात असलेल्या कुलदीप शाहूने शेजारील हॉटेलमधून तेलाने भरलेली कढई घनश्याम सोनवाणी यांच्या अंगावर फेकली. सोनवाणी गंभीर झाल्याचे पाहून आरोपी कुलदीप शाहू फरार झाला. पोलीस हेड कॉन्स्टेबल तालिब शेख हे आरोपीला पकडण्याची तयारी करत असतानाच कुलदीप शाहू याने त्यांच्या घरात घुसून त्यांची पत्नी आणि मुलीची धारदार हत्याराने वार करून हत्या केली.