दुर्ग :- (छत्तीसगड) :- जिल्ह्यातून नात्याला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. नंदिनी पोलीस ठाण्याच्या हद्दीत शनिवारी एका तरुणाने आजीचा त्रिशूळाने वार करून जीव घेतला. धक्कादायक बाब म्हणजे यानंतर त्याने जवळच्या शिवमंदिरात जाऊन आजीच्या रक्ताने अभिषेक केला.येथे त्याने ‘श्री शिवाय नमस्तुभ्यं’ असंही लिहिलं.मिळालेल्या माहितीनुसार, आरोपीने स्वतःलाही त्रिशूळाने दुखापत करून घेतली आहे. यामध्ये तो जखमी झाला आहे. पोलिसांनी आरोपी नातू गुलशनला ताब्यात घेऊन उपचारासाठी रुग्णालयात पाठवलं आहे. सध्या त्यांच्यावर एम्स रायपूरमध्ये उपचार सुरू आहेत.
या घटनेबाबत माहिती देताना नंदिनी पोलीस स्टेशनचे अधिकारी मनीष शर्मा यांनी सांगितलं की, दुर्ग जिल्ह्यातील नंदिनी पोलीस स्टेशन हद्दीतील मंदिरात पुजारी म्हणून काम करणारा गुलशन गोस्वामी हा आजी रुक्मणी गोस्वामी यांच्यासोबत राहतो. शनिवारी रात्री साडेसातच्या सुमारास गुलशनने ७० वर्षीय आजीवर त्रिशूळ हल्ला केला.या हल्ल्यात आजीच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आणि त्या खाली पडल्या. यानंतर नातू गुलशन याने आजी रुक्मणीचं रक्त गोळा केलं आणि जवळच्या शिवमंदिरात जाऊन अभिषेक केला. त्याने शिवलिंगाभोवती रक्त टाकलं आणि हाताने त्यावर ‘श्री शिवाय नमस्तुभ्यं’ लिहिलं. या तरुणाने मंदिरातूनच त्रिशूळ नेल्याचं सांगितलं जात आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.