मतांसाठी रचलं अजब षडयंत्र!जळगाव विधानसभा निवडणुकीत सहानुभूती मिळवण्यासाठी उमेदवाराने स्वतःच्याच घरावर केला गोळीबार

Oplus_131072
Spread the love

जळगाव :- विधानसभा निवडणुकीला निकाल जाहीर होऊन दोन आठवडे उलटून गेले आहेत. त्यानंतर आता राज्यात महायुतीचा खातेवाटपाचा पेच सुटून शपथविधीचा कार्यक्रम पार पडला. विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर मतदारांनी महायुतीला भरभरून मतदान केल्याचं समोर आलं.राज्यात मतदारांनी महायुतीलाच पसंती दिल्याचं समोर आलं. मात्र, जळगावात निवडणुकीच्या काळात एका उमेदवाराने मतांसाठी धक्कादायक कृत्य केल्याचं समोर आलं आहे.

विधानसभा निवडणुकीच्या काळात मतदारांची सहानभूती मिळवण्यासाठी जळगावमधील अपक्ष उमेदवाराने स्वतःच्या घरावरच गोळीबार केल्याचं समोर आलं आहे. मतदानाच्या दोन दिवसाआधी ही घटना घडली होती. जळगाव पोलिसांच्या तपासातून धक्कादायक माहिती उघड झाली आहे. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर जळगाव एलसीबीच्या पथकाकडून तिघांना अटक करण्यात आली आहे.

नेमकं काय घडलं?

जळगाव शहर विधानसभा मतदारसंघातून मेहरुण परिसरातील शेरा चौकात राहणारे निवृत्त शिक्षक अहमद हुसेन शेख (वय ५०) यांनी अपक्ष निवडणूक लढविली होती. निवडणुकी दरम्यान १८ नोव्हेंबर रोजी पहाटे चार वाजता शेख कुटुंबीय साखर झोपेत असतानाच दुचाकीवरून आलेल्या संशयितांनी घरावर दोन गोळ्या झाडल्या होत्या. उमेदवार शेख अहमद शेख हुसेन याचा शालक इरफान अहमद (वय ३२, रा. मालेगाव) हा त्याचा मित्र मोहम्मद शफिक उर्फ बाबा (रा. मालेगाव) याच्यासोबत १७ नोव्हेंबर रोजी रात्री मालेगावहून जळगावला आले. त्यानंतर पहाटे ४ वाजेच्या सुमारास मोहम्मद शफिक उर्फ बाबाने इरफान अहमदसोबत येऊन घरावर गोळीबार केल्याचे या तपासात निष्पन्न झाले आहे. या प्रकरणी पोलिसांनी बुधवारी इरफान मोहम्मद याला मालेगावमधून ताब्यात घेतले. तर त्याच्यासह उमेदवार असलेल्या अहमद शेख यालाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. उमेदवाराचा मोठा मुलगा शिबान हुसेन (वय २३, रा. शेरा चौक, मेहरुण) यालादेखील पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तर मोहम्मद शफिक उर्फ बाबा व उमर शेख फारुख हे दोन्ही संशयित फरार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

मुख्य संपादक संजय चौधरी