चंद्रपूर :- बालपणीच्या मित्रानेच मैत्रिणीची हत्या करुन मृतदेह शौचालयाच्या टाकीमध्ये टाकल्याची धक्कादायक प्रकार समोर आला आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर येथील ही घटना आहे.अरुणा काकडे असे मृतक महिलेचे नाव असून ती चिमूर शहरातील रहिवाशी होती. याप्रकरणी पोलिसांनी निलंबित पोलीस नरेश डाहुले याला अटक केली आहे.
काय आहे प्रकरण?
चंद्रपूर जिल्हातील चिमूर शहरात देवांश जनरल स्टोर्सच्या संचालिका अरुणा काकडे या 26 नोव्हेंबरला इतवारी मार्केटमध्ये सामान खरेदी करण्यासाठी गेल्या होत्या. मात्र त्या घरी परतल्या नाहीत. त्यामुळे कुटुंबीयांना शंका आली. त्यानतंर कुटुंबीयांना अरुणा बेपत्ता असल्याची तक्रार चिमूर पोलीस स्टेशनला नोंदवली. तक्रारीची दखल घेत नागपूर, चंद्रपूर पोलिसांनी या घटनेचा संयुक्तपणे तपास केला. या तपासात निलंबत पोलीस कर्मचारी नरेश डाहूले याने हत्या केल्याचे पुढे आले.
घरफोडीत आरोपीचा समावेश
पोलीस कर्मचारी असलेल्या नरेश डाहूले याचा चंद्रपुरातील अनेक घरफोड्यांमध्ये समावेश आढळून आला होता. त्यामुळे त्याला मागील वर्षी अटक करण्यात आली होती. पोलीस दलातून त्याला निलंबित करण्यात आले आहे.मृत्यू झालेली महिला अरुणा काकडे आणि आरोपी हे दोघे बालपणीचे मित्र होते. दोघेही एकाच शाळेत शिक्षण घेत होते. 26 डिसेंबर रोजी मृत अरुणा आणि आरोपी नरेश नागपूरला एकत्र होते, अशी माहिती पोलिसांनी दिली. मागील काही दिवसापासून दोघांमध्ये वाद सुरु होता. हा वाद विकोपाला गेल्यामुळे आरोपीने अरुणाचा गळा दाबून तिची हत्या केली. पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.