सोयगाव :, (साईदास पवार ) सोयगाव तालुक्यात अनेक भागांत बुधवारी सकाळी धुक्याची झालर पसरल्याचे चित्र दिसून आले. जिल्ह्यात गारठा वाढला असून थंडीचा कडाकाही काहीसा वाढला आहे. रविवारी ते मंगळवारी रात्री १३ अंश सेल्सिअसपेक्षा कमी तापमान होते.तालुक्यात सध्या रात्री थंडी, पहाटे वारा आणि दुपारी कडक ऊन असे वातावरण आहे. सायंकाळी वातावरणात अचानक बदल झाल्याचे प्रकर्षाने जाणवत आहे. सोयगावच्या ग्रामीण भागांत सायंकाळी पाच वाजल्यापासून दाट धुके पसरत असल्याचे चित्र होते. पहाटे तर धुक्याचे प्रमाण जास्त असते. पुढील एक-दोन दिवसांत गारठा आणखीन वाढणार असल्याचे संकेत सध्याच्या वातावरणावरून मिळत आहेत. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून गायब झालेली थंडी पुन्हा वाढणार असल्याची शक्यता आहे.
—-शेकोट्या पेटणार, गप्पांचे फड रंगणार
थंडीचा कडाका जसजसा वाढत जाईल तसे रात्रीच्या वेळी तरुणाईचे शेकोटी पेटवून गप्पांचे फड रंगल्याचे दृश्य मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत आहे. अशाही स्थितीत शेतकरी रात्री शेतात काम करताना दिसून येतात.
शेतपिकासाठी थंडी आवश्यक असते. नोव्हेंबरच्या अखेरच्या आठवड्यात थंडीला सुरुवात झाली. त्यामुळे झाडांना पालवी आणि मोहोर फुटण्याची प्रक्रिया सुरू झाली;..