सोयगाव तालुक्यात नवीन शिधापत्रिकांच्या कामांना वेबसाइटचा खोडा; कामेही खोळंबली

Spread the love

सोयगाव, ता.१८.(साईदास पवार ): सोयगाव तालुक्यात नवीन शिधापत्रिका काढणे,शिधापत्रिकेतून नाव कमी करणे किंवा समाविष्ट करणे, शिधापत्रिकेद्वारे धान्य मिळवणे आदी सर्व गोष्टी अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या ‘आरसीएमएस’ संकेतस्थळावरून करणे बंधनकारक आहे. मात्र, मागील काही दिवसांपासून या विभागाची वेबसाइट संथ गतीने सुरू आहे. दुसरीकडे वेबसाइट काहीवेळा बंदच असते. परिणामी नागरिकांबरोबर कर्मचाऱ्यांनाही नाहक त्रास सहन करावा लागत आहे.नागरिकांची अडचण लक्षात घेता पुरवठा विभागाने साइट अद्ययावत करण्याची मागणी होत आहे. गरीब तसेच गरजू नागरिकांना अन्नधान्य मिळावे, यासाठी स्वस्त धान्य दुकानाच्या माध्यमातून रेशन पुरविले जाते, मात्र यासाठी प्रथम रेशन कार्ड काढणे गरजेचे आहे. तर काहीवेळा रेशनमधील नावे कमी करणे, दुय्यम प्रत तयार करणे आदी कामे ऑनलाइन करावी लागतात. यासाठी असलेली’आरसीएमएस’ ही साइट मागील अनेक दिवसांपासून बंद पडल्यागत आहे.
शिधापत्रिकासंबंधित अनेक कामे खोळंबल्याने नागरिकांमध्ये रोष निर्माण झाला आहे. पुरवठा विभागातील कर्मचारीही यामुळे त्रस्त झाले असून, त्यांनाही कार्यालयात येणाऱ्या नागरिकांचे बोलणे ऐकावे लागत आहे. संकेतस्थळाला नियमित अडचणी येत आहे. या प्रकाराचा फटका सामान्य नागरिकांसह कर्मचाऱ्यांना सहन करावा लागत आहे. संकेतस्थळाच्या अडचणी दूर करून सामान्य नागरिकांना होणारा त्रास कमी करण्याची मागणी आता नागरिकांतून होत आहे….

मुख्य संपादक संजय चौधरी