कापसाला दहा हजार रुपयांचा भाव देण्यात यावा.-आमदार अमोल पाटील यांची विधानसभेत मागणी.

Spread the love

एरंडोल :- यावर्षी अतिवृष्टीमुळे कापसाच्या उत्पादनात घट झाली असून दर कमी मिळत असल्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत,शासनाने शेतक-यांसमोर उभ्या राहिलेल्या समस्येची दखल घेवून कापसाला दहा हजार रुपये भाव द्यावा अशी मागणी आमदार अमोल पाटील यांनी विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनात
केली.तसेच मतदारसंघातील गावांचा पोखरा योजनेत समावेश करण्याची मागणीही त्यांनी केली. विधानसभेचे हिवाळी अधिवेशन नागपूर येथे सुरु असून आमदार अमोल पाटील यांनी अतिवृष्टीमुळे कापूसासह ज्वारी,बाजरी,मका यासह खरीप पिकांचे झालेले नुकसान,कमी उत्पादन,शेतक-यांसमोर उभे राहिलेले आर्थिक संकट या विषयांना विधानसभेत वाचा फोडली.यावर्षी अतिवृष्टीमुळे कापसाच्या उत्पादनात मोठी घट
झाली असून कापूस खरेदी केंद्रांवर सात ते साडेसात हजार रुपये क्विंटल या दराने खरेदी केली जात आहे.पावसामुळे कापसाचा रंग काळपट झाल्यामुळे दर कमी मिळत असून खासगी व्यापारी सहा ते साडेसहा हजार रुपये दराने कापसाची खरेदी करीत आहेत. कापसाला कमी भाव मिळत असल्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडले असून कापसाला दहा हजार रुपये दर देण्याची मागणी त्यांनी केली.तसेच एरंडोल मतदारसंघातील एरंडोल,पारोळा व भडगाव या तालुक्यात रब्बी हंगामात ज्वारी,बाजरी,मका या पिकांची पेरणी मोठ्या प्रमाणावर करण्यात येते.मात्र यावर्षी पिकविम्यातून या तीनही पिकांना वगळण्यात आले आहे.मागील वर्षी
तीनही तालुक्यातून शासकीय धान्य खरेदी योजनेअंतर्गत सुमारे तीस ते पस्तीस हजार क्विंटल ज्वारी व बाजरी आणि साथ ते सत्तर हजार क्विंटल मक्याची शासकीय हमी भावाने खरेदी करण्यात आली होती.मात्र यावर्षी मतदारसंघातील तीनही तालुक्यात ज्वारी,बाजरी व मका या रब्बी पिकांना पिकविम्यातून वगळण्यात आल्यामुळे शेतक-यांवर अन्याय केला जात आहे.तीनही पिकांचा
पिकविम्यात सहभाग करण्यात यावा अशी मागणी त्यांनी केली.तसेच मतदारसंघातील ज्या गावांचा पोखरा योजनेत समावेश करण्यात आलेला नाही त्या सर्व गावांचा योजनेत समावेश करण्यात यावा अशी मागणी आमदार अमोल पाटील यांनी केली आहे. दरम्यान आमदार अमोल पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे,अजित पवार यांचेसह मंत्रीमंडळातील
गिरीश महाजन,संजय सावकारे,गुलाबराव पाटील,भरत गोगावले, अतुल सावे,मंगलप्रभात लोढा,संजय शिरसाठ,योगेश कदम यांच्या भेटी घेवून त्यांचा सत्कार केला.मतदारसंघातील विकासकामांसाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही असे आश्वासन सर्व मंत्र्यांनी दिल्याचे आमदार अमोल पाटील यांनी सांगितले.

मुख्य संपादक संजय चौधरी