सोयगाव: (साईदास पवार ) विधानसभा निवडणुकीची रणधुमाळीस जवळपास एक महिना होत आहे. आता प्रामुख्याने प्रश्न भेडसावत आहे, तो म्हणजे खड्यांमुळे जर्जर झालेल्या रस्त्यांचा. जिल्ह्यातील सोयगाव हे गाव मराठवाडा-खान्देश व विदर्भाच्या सीमेवर आहे.खान्देशातील जळगाव जिल्ह्यातील शेंदुर्णीच्या सीमेपासून मराठवाड्यातील सोयगावकडे येणारा रस्ता खड्डेमय झाला आहे. त्यामुळे निवडणुका संपल्या, आता या रस्त्याची दुरुस्ती कधी करणार? असा सवाल नागरिक उपस्थित करीत आहेत.तसेच चाळीसगाव ते फरदापुर या रस्त्यावर सोयगाव-बनोटी-नागद या रस्त्यावर वाहनचालकांना मोठी कसरत करीत या रस्त्यावरून वाहने चालवावी लागत आहेत. याकडे सार्वजनिक बांधकाम असो की जिल्हा परिषदेचा बांधकाम विभाग; त्यांनी आपापल्या अखत्यारीतील रस्ते तत्काळ दुरुस्तीसाठी हाती घ्यावेत, अशीमागणी वाहनधारकांकडून होत आहे.
चौकट;-सोयगाव तालुक्यातील ‘या’ भागातील रस्ते बनले खड्डेमय
सोयगाव तालुक्यातील, बनोटी ते सोयगाव, पाचोरा ते बनोटी, तिडका ते घाटनांद्रा, बनोटी ते नागद आणि सोयगाव-शेंदुर्णी या भागांतील रस्ते खड्डेमय झाल्याचे पाहायला मिळते. खान्देश-मराठवाड्याच्या सीमेवरील सोयगाव ते शेंदुर्णी या मार्गावर ठिकठिकाणी खड्डे पडले असून, रस्त्यांची चाळण झाली आहे.
खान्देशातून मराठवाड्यात येणारे नातेवाईक, पाहुणे म्हणतात की, काय तुमचा मराठवाड्यातील रस्ता, काय ही धूळ, काय हे खड्डे, असे शब्द नेहमी कानांवर पडतात. त्यामुळे येथील नागरिकांना त्यांचे हे बोलणे गुपचूप ऐकावे लागते. विकासकामांबाबत विचार करायचा झाला तर तालुक्यातील रस्त्यांवर दरवर्षी शासनाकडून कोट्यवधी रुपये खर्च होतात, मात्र काही अपवादात्मक वगळले तर एक दोन वर्षांनी दुरुस्ती केलेले रस्ते पुन्हा खड्ड्यात जातात. याकडे बांधकाम यंत्रणाही दुर्लक्ष करताना दिसतात. मुळात जे रस्ते होतात, ते निकषांप्रमाणे व्हायला हवेत; ते होत नाहीत. निकषांप्रमाणे खडीकरण, डांबरीकरण होताना दिसत नाही. बांधकाम यंत्रणांचे जे नियंत्रण त्यांवर असायला हवे, ते नसते. रस्त्यांची कामे होतात आणि एक-दोन वर्षांतच पुन्हा रस्त्यात खड्डे असे चित्र सर्रासपणे पाहायला मिळते. कुणी कितीही दावा केला तरी पावसाळ्यात या निकृष्ट दर्जाच्या कामांचा पोलखोल होतो आणि लोकांना पुन्हा खड्डेमय रस्त्याने प्रवास करावा लागतो. हे वास्तव आजचेच नाही तर वर्षानुवर्षांचे आहे. या निकृष्ट काम करणाऱ्यांवर कारवाई होत नसल्याने हे रस्ते एक-दोन वर्षांनी खड्ड्यात जातात.आता निवडणुका संपून एक महिना झाला आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग किंवा जि. प. बांधकाम विभागाकडून खड्डे भरण्याचे काम हाती घेणे अपेक्षित होते. मात्र अद्यापही त्याला सुरुवात झाली नाही. सा. बां. विभागाकडे दरवर्षी मोठ्या प्रमाणावर रस्तेदुरुस्ती आणि नव्या रस्त्यांसाठी निधी उपलब्ध होतो. तरीही सोयगाव परिसरातील अनेक रस्त्यांची दरवर्षी दुरवस्था का होते, हे एक कोडेच आहे.