टाटा आयपीएल – सनरायझर्स हैदराबादचा जबरदस्त विजय

Spread the love
छायाचित्र सौजन्य : गुगल

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : टाटा आपीएल २०२२ चा पंचवीसवा सामना सनरायझर्स हैदराबाद आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात मुंबईच्या ब्रेबॉर्न स्टेडियमवर खेळवण्यात आला. सनरायझर्स हैदराबादने ७ गडी आणि १३ चेंडू राखून हा सामना जिंकला. सनरायझर्स हैदराबादने नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले. कोलकाता नाईट रायडर्सकडून डावाची सुरूवात करायला व्यंकटेश अय्यर आणि अॅरोन फिंच उतरले. फिंचला मार्को जानसेनने केवळ ७ धावांवर बाद केले. कर्णधार श्रेयस अय्यरने धावा वाढवण्यासाठी आपली शक्ती पणाला लावली.

नटराजनने व्यंकटेश अय्यरचा त्रिफाळा उध्वस्त केला. सुनील नरेनला नटराजनने तंबूचा रस्ता दाखवला. श्रेयस अय्यर आणि नितीश राणा जोडी चांगला जम बसवू लागली. दोघेही पाहिजे तिथे धावा काढत होते. उमरान मलिकने श्रेयस अय्यरच्या २८ धावांवर यष्ट्या वाकवल्या. शेल्डॉन जॅकसनला उमरान मलिकने झटपट तंबूचा रस्ता दाखवला. कोलकात्याचा १०३/५ निम्मा संघ तंबूत परतला होता. नितीश राणा आणि आंद्रे रस्सेलने सामन्याची सूत्र आपल्या हातात घेतली. दोघंही नजरेच्या इशार्‍यावर धावा काढत होते. नटराजनने कोलकत्यावर पुन्हा आघात केला. यावेळी नितीश राणा बाद झाला. त्याने ६ चौकार आणि २ षटकारांच्या सहाय्याने केवळ ३६ चेंडूंत ५४ धावा काढल्या. पॅट कमिन्सला भुवनेश्वर कुमारने स्वस्तात तंबूचा रस्ता दाखवला. अमन खानचा जगदीशा सुछिथने त्रिफाळा उध्वस्त केला. आंद्रे रस्सेलने याच षटकात प्रेक्षकांचे खास मनोरंजन केले. रस्सेलने प्रत्येकी ४ चौकार आणि षटकारांच्या सहाय्याने केवळ २५ चेंडूंत बिनबाद ४९ धावा काढल्या. २० षटकांच्या अखेरीस कोलकत्ता १७५/८ असा स्थिरावला.

सनरायझर्स हैदराबादकडून खेळाची सुरूवात करायला अभिषेक शर्मा आणि कर्णधार केन विल्यमसन उतरले. पॅट कमिन्सने अभिषेक शर्माचा त्रिफाळा उध्वस्त केला. आंद्रे रस्सेलने केन विल्यमसनचा त्रिफाळा उध्वस्त केला. राहुल त्रिपाठी आणि आयदेन मार्कराम यांनी धावांचा पाऊस कसा पडतो याचं प्रात्यक्षिक उपस्थित प्रेक्षकांना दाखवलं. राहुलला आंद्रे रस्सेलने ७१ धावांवर बाद केले. विजयाची औपचारिकता पूर्ण करायला निकोलस पूरन खेळपट्टीवर आला. मार्करामने पॅट कमिन्सच्या १८ व्या षटकात १ चौकार आणि लागोपाठ २ षटकार मारत विजयावर हैदराबादचे नाव कोरले. आयदेन मार्करामने ६ चौकार आणि ४ षटकारांच्या सहाय्याने केवळ ३६ चेंडूंत बिनबाद ६८ धावा काढल्या. निकोलस पूरनने बिनबाद ५ धावा काढल्या. आजचा दिवस सनरायझर्स हैदराबादचा होता. नाणेफेकीचा कौल ते विजयी षटकार सारं कसं नियोजनबद्ध होतं.

राहुल त्रिपाठीला सामन्याचा सर्वोत्कृष्ट खेळाडू हा पुरस्कार देण्यात आला. त्याने ७१ धावा काढून महत्त्वपूर्ण योगदान दिलं होतं.
उद्याचा पहिला सामना मुंबई इंडिअन्स आणि लखनौ सुपर जायंट्स यांच्यात मुंबईच्या ब्रेबॉर्न स्टेडियमवर होणार आहे. तर दुसरा सामना दिल्ली कॅपिटल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू यांच्यात मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर होणार आहे. मुंबईकडे गमावण्यासाठी काही नाही त्यामुळे ते निश्चितच पहिल्या विजयासाठी प्रयत्न करतील.

टीम झुंजार