जळगाव शहरातून चोरी झालेली महागडी कार पोलीस उपनिरीक्षक व सहकाऱ्यांनी राजस्थानातून केली हस्तगत.

Spread the love

जळगाव :- शहरातील जिल्हापेठ, रामानंद नगर आणि जळगाव तालुका पोलिस स्टेशन हद्दीतील प्रतिष्ठीतांच्या तिन महागड्या चारचाकी कार चोरी झाल्या होत्या. हायटेक तंत्रज्ञानाचा वापर या वाहन चोरीच्या गुन्ह्यात सफाईदारपणे झाला होता.यापैकी एक कार राजस्थानातून हस्तगत करण्यात आली आहे. शिवाय दोघा आंतरराज्य चोरट्यांना देखील ताब्यात घेण्यात आले आहे. जळगाव शहरातील तिन पोलिस स्टेशनला दाखल कार चोरीच्या तिन्ही गुन्ह्यांचा समांतर तपास संबंधीत पोलिस स्टेशनसह स्थानिक गुन्हे शाखा करत होती. सीसीटीव्ही फुटेज तपासणीचे काम सुरु असतांना देखील हवी तशी माहिती मिळत नव्हती. दरम्यान पोलिस उप निरीक्षक शरद बागल यांना खब-यांकडून सखोल माहिती समजली. त्या माहितीच्या आधारे मिळालेल्या मोबाईल क्रमांकांचे तांत्रीक विश्लेषण करुन पथकाने राजस्थान गाठले.

पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने राजस्थानच्या जालोर जिल्ह्याच्या पोलिस अधिक्षकांची भेट घेतली. त्यानंतर चर्चेअंती स्थानिक पोलिसांच्या मदतीने गुन्ह्यातील दोघा चोरट्यांना ताब्यात घेण्यात एलसीबी पथकाला यश आले. मात्र ताब्यातील दोघे चोरटे गुन्ह्याची हवी तशी माहिती देत नव्हते. पोलीस उप निरीक्षक शरद बागल यांनी ताब्यातील दोघा चोरट्यांकडून त्यांच्या इतर दोघा साथीदारांची माहिती प्राप्त केली. तपास पथकातील सहायक फौजदार अतुल वंजारी व हे.कॉ. हरीलाल पाटील यांनी ताब्यातील दोघा चोरट्यांना जळगाव येथे आणले.पोलीस उपनिरीक्षक शरद बागल व हे.कॉ. विजय पाटील हे दोघे राजस्थानच्या सांचोर तालुक्यात इतर दोघा चोरट्यांच्या शोधार्थ आणि चोरीच्या कारचा शोध घेण्यासाठी मुक्कामी थांबले. साचोर हे ठिकाण वालुकामय आणि विरळ लोकवस्तीचे होते. अशा विरळ लोकवस्तीसह वालुकामय जागी चोरीचे वाहन शोधण्यासह इतर चोरट्यांना शोधण्याचे आव्हान उभे होते. तांत्रीक विश्लेषणाच्या मदतीने पोलीस उपनिरीक्षक शरद बागल व हे.कॉ. विजय पाटील यांनी तळपत्या उन्हात चोरीच्या वाहनासह इतर दोघा साथीदारांचा शोध सुरु ठेवला.

दरम्यान मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे रामानंद नगर पोलिस स्टेशनला दाखल चोरीच्या गुन्ह्यातील टोयाटो कंपनीची इनोव्हा क्रिस्टा कार सांचोरच्या जंगलातुन स्थानीक पोलिसांच्या मदतीने ताब्यात घेण्यात आली. त्या कारचे फोटो फिर्यादीस व्हाटस अ‍ॅपवर ओळख पटवण्याकामी पाठवण्यात आले. फिर्यादीने ती कार आपलीच असल्याचे ओळखले. पोलिस उप निरीक्षक शरद बागल व हे.कॉ. विजय पाटील या दोघांनी बेवारस स्थितीत ताब्यात घेतलेली कार आलटून पालटून स्वत: चालवत जळगावला आणली. जवळपास एक हजार किलो मिटर अंतर कापून राजस्थान ते जळगाव प्रवास केल्यानंतर ते वाहन रामानंद नगर पोलिस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले. पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या पथकातील पोलीस उप निरिक्षक शरद बागल, सहायक फौजदार अतुल वंजारी, पोलीस हवालदार हिरालाल पाटील, पोलीस हवालदार विजय पाटील, चालक पोलीस शिपाई महेश सोमवंशी यांच्या पथकाने या कारवाईत सहभाग घेतला.

मुख्य संपादक संजय चौधरी