जळगावात नायलॉनचा मांजा विक्री करणाऱ्या तरूणाला अटक; एरंडोलला पोलीस निरीक्षकांनी घेतली दुकानांची झाडाझडती

Spread the love

जळगाव :- शहरातील सुप्रिम कॉलनी परिसरात प्रतिबंधित असलेला नायलॉनचा मांजा विक्री करणाऱ्या तरूणावर जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कारवाई करत बुधवारी १ जानेवारी रोजी दुपारी १ वाजता अटक केली आहे.त्याच्याकडून नायलॉन मांजा जप्त करण्यात आला असून एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिनेश लक्ष्मण चौधरी वय-३५, रा.श्रीकृष्ण नगर, सुप्रिम कॉलनी, जळगाव असे अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव शहरातील सुप्रिम कॉलनी परिसरात प्रतिबंधित असलेला नायलॉनचा मांजा विक्री होत असल्याची गोपनिय माहिती जळगाव स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांना मिळाली. त्यानुसार पथकातील पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय पोटे, सहाय्यक फौजदार राजेश मेढे, रविंद्र नरवाडे, अतुल वंजारी, अक्रम शेख यांच्यासह पथकाने बुधवारी १ जानेवारी रोजी दुपारी १ वाजता कारवाई करत संशयित आरोपी दिनेश चौधरी हा नायलॉनचा मांजा विक्री करतांना आढळून आला. त्याच्याकडून नायलॉनचा मांजा व इतर साहित्य जप्त केले आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस कर्मचारी करीत आहे.

एरंडोल येथे तपासणी

एरंडोल येथे नवीनच पोलीस निरीक्षक पदाच्या पदभार हाती घेतलेले पोलीस निरीक्षक निलेश गायकवाड यांनी एरंडोल शहरातील सर्व पतंग व मांजा विक्रेते यांच्या दुकानांची तपासणी केली व सर्व विक्रेत्यांना सूचना दिल्या की कोणीही नायलॉन मांजाची विक्री करू नये कोणताही दुकानदार विक्री करीत आढळल्यास त्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल अशी सूचना देण्यात आली यावेळी पोलीस निरीक्षक निलेश गायकवाड यांच्यासोबत पोलीस अनिल पाटील, मिलिंद कुमावत, संदीप पाटील, यावेळी हजर होते.

मुख्य संपादक संजय चौधरी