इंदूर :- मध्य प्रदेशातील इंदूर येथे होमोओपॅथी डॉक्टर सुनील साहू हत्याकांडात पोलिसांनी मोठा खुलासा केला आहे. या हत्येप्रकरणी मृत डॉक्टरची पत्नी सोनाली आणि तिचा प्रियकर वकील संतोष शर्मा यांना पोलिसांनी अटक केली आहे. अनैतिक संबंधातून ही हत्या झाल्याचं समोर आलं आहे. पत्नी आणि तिच्या प्रियकराने डॉक्टर पतीची हत्या करण्यासाठी सुपारी दिली होती. दीड लाख रुपये देऊन शूटरकडून ही हत्या करण्यात आली असं पोलीस तपासात उघड झाले.आरोपी पत्नी सोनाली आणि तिचा प्रियकर संतोष शर्माने अलीगडमधील एका मित्राशी संपर्क साधला त्याने दीड लाख रुपयाच्या बदल्यात २ शूटरला पाठवले.
या प्रकरणी पोलिसांनी डॉक्टर पत्नी, तिचा प्रियकर यांच्यासह ५ जणांना अटक केली आहे. पोलिसांनी आरोपीकडून देशी कट्टाही जप्त केला आहे. रात्री १० च्या सुमारास डॉक्टर सुनील साहू यांच्या कुंदन नगर येथील जीवनधारा दवाखान्यात रुग्ण बनून आलेल्या तिघांनी डॉक्टरची गोळ्या झाडून हत्या केली होती. या प्रकरणात सर्वात आधी पोलिसांनी डॉक्टरची पत्नी सोनाली साहूला अटक केली होती. तिला पोलिसांच्या खाकीचा धाक दाखवताच तिने गुन्ह्याची कबुली दिली. त्यानंतर रविवारी उज्जैन येथून संतोष शर्मा, त्याचा मित्र मनोज सुमन आणि इतर साथीदारांना अटक केली. या हत्याकांडातील मुख्य आरोपी संतोष शर्मा इंदूर कोर्टात हजर झाला. या प्रकरणातील आरोपी प्रकाश यादवने चौकशीत सांगितले की, संतोषचं लग्नाआधीच डॉक्टर पत्नी सोनालीसोबत अफेअर होते. संतोषने डॉक्टरची हत्या करण्यासाठी दीड लाखाची सुपारी दिली होती. संतोषने संपूर्ण हत्येचे षडयंत्र रचलं होते. घटनेच्या दिवशी संतोष उज्जैन येथील एका मित्राकडे त्याचा मोबाईल सोपवून इंदूरला आला होता.
कुंदन नगरमध्ये हत्येवेळी तोदेखील कारमध्ये हजर होता. कुणालाही संशय येऊ नये आणि लोकेशन ट्रेस होईल त्यामुळे त्याने मोबाईल मित्राकडे दिला होता. सोनाली आणि संतोषचं व्हॉट्सअप चॅट पतीने पाहिले होते. तेव्हापासून पत्नी सोनालीसोबत त्याचे वाद सुरू होते. या वादातूनच सोनालीने प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या करण्याचं ठरवलं. गेल्या ८ महिन्यापासून डॉक्टरला मारण्याचं प्लॅनिंग सुरू असल्याचं तपासात उघड झाले आहे.