धनबाद : – झारखंडमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. धनबाद जिल्ह्यातील एका खाजगी शाळेत 80 मुलींना त्यांचे शर्ट काढण्याचे आदेश देण्यात आल्याची घटना समोर आली आहे. शनिवारी (11 जानेवरी) याबाबत माहिती देताना एका अधिकाऱ्याने सांगितले की, एका खाजगी शाळेच्या मुख्याध्यापकांवर 10 वीच्या 80 विद्यार्थिनींना संदेश लिहिण्यासाठी त्यांचे शर्ट काढण्याचे आदेश दिल्याचा आरोप आहे.प्रशासनाने या आरोपांची चौकशी सुरु केली आहे.
नेमके प्रकरण काय?
इयत्ता दहावीची परिक्षा झाल्यानंतर आता पुन्हा शाळेत एकत्र भेटता येणार नाही, यासाठी मुलींनी एकमेकींच्या शर्टवर निरोपाचा संदेश लिहून ती आठवण जतन करण्यासाठी ‘पेन डे’ साजरा केला. मात्र मुख्याध्यापकांना विद्यार्थींनींचा हा प्रकार आवडला नाही. शर्टवर संदेश लिहिलेल्या विद्यार्थींनींना त्यांनी थेट शर्ट काढण्याचे फर्मान सोडले. विद्यार्थींनींनी माफी मागूनही मुख्याध्यापकांचे समाधान झाले नाही.
असा आरोप आहे की, मुलींना शर्टशिवाय ब्लेझर घालून घरी परतण्यास भाग पाडण्यात आले. धनबादच्या उपायुक्त (डीसी) माधवी मिश्रा यांनी सांगितले की, शुक्रवारी जोरापोखरा पोलिस स्टेशन हद्दीतील दिगवाडीह येथील एका शाळेत ही घटना घडली. मुलींच्या तक्रारीवर पालक संतापले. पालकांनी डीसीकडे केलेल्या तक्रारीत म्हटले की, परीक्षा दिल्यानंतर, दहावीचे विद्यार्थी एकमेकांच्या शर्टवर संदेश लिहून ‘पेन डे’ साजरा करत होते. मुख्याध्यापकांनी यावर आक्षेप घेतला आणि विद्यार्थिनींना त्यांचे शर्ट काढण्यास सांगितले. तथापि, नंतर त्यांनी या कृत्याबद्दल माफी मागितली. पालकांनी डीसींना सांगितले की, सर्व विद्यार्थिनींना ब्लेझर घालून शर्टशिवाय घरी परत पाठवण्यात आले.धनबादच्या उपायुक्त (डीसी) माधवी मिश्रा यांनी पुढे सांगितले की, अनेक पालकांनी मुख्याध्यापकांविरुद्ध तक्रार दाखल केली आहे. आम्ही काही पीडित मुलींशीही बोललो. प्रशासनाने हे प्रकरण गांभीर्याने घेतले आहे. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी चौकशी समिती स्थापन करण्यात आली आहे. या चौकशी समितीमध्ये उपविभागीय दंडाधिकारी, जिल्हा शिक्षण अधिकारी, जिल्हा समाजकल्याण अधिकारी आणि उपविभागीय पोलिस अधिकारी यांचा समावेश आहे.
मिश्रा यांनी शेवटी सांगितले की, चौकशी समितीच्या अहवालाच्या आधारे कारवाई केली जाईल.या घटनेनंतर आता धनबादमध्ये एकच संताप व्यक्त करण्यात येत आहे. स्थानिक आमदार रागिनी सिंह यांनी पालकांच्या नाराजीचे समर्थन केले. सदर घटना लाजिरवाणी आणि दुर्दैवी असल्याचे त्या म्हणाल्या. शनिवारी पालकांनी मुख्याध्यापकांविरुद्ध तक्रार दाखल केली तेव्हा झरियाच्या आमदार रागिनी सिंह देखील त्यांच्यासोबत डीसी कार्यालयात उपस्थित होत्या,