
अहिल्यानगर :- नवऱ्यासह सासरच्यांनी विवाहितेला जाळून मारल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. किर्ती अनिकेत धनवे (वय-२२) असे हत्या झालेल्या विवाहित महिलेचे नाव आहे.दीड वर्षांपूर्वी कीर्ती आणि अनिकेत या दोघांनी कुटुंबीयांच्या विरोधात जाऊन प्रेमविवाह केला होता.
मिळालेल्या माहितीनुसार, दीड वर्षापूर्वी वडगाव येथील अनिकेत धनवे आणि उल्हासनगर येथे राहणारी किर्ती धनवे यांचा प्रेमविवाह झाला होता. अनिकेत आणि किर्ती यांचे लग्नाच्या पूर्वीपासून जवळचे नातेसंबंध होते. प्रेमविवाह केल्यानंतर त्यांचे रितसर लग्न लावून दिले. मात्र विवाहितेच्या सासरच्यांनी तिला सून मान्य केले नव्हते. तिला सासरच्यांकडून सातत्याने जाच सुरू होता. याच कारणातून सासरच्या लोकांनी किर्तीला जाळून मारले आहे.
मंगळवारी दुपारी किर्ती शेतातील छप्परामध्ये स्वयंपाक करीत होती, याचवेळी नवरा अनिकेत अंकुश धनवे, सासू करुणा अंकुश धनवे, सासरे अंकुश होनाजी धनवे यांनी त्यांच्या इतर साथिदाराच्या मदतीने तिची जाळून हत्या केली असल्याची फिर्याद विवाहितेचे वडील संतोष विठ्ठल अंग्रख यांनी पाथर्डी पोलीस ठाण्यात दिली आहे. याबाबत पोलीस अधिक तपास करीत आहेत.