यावल :- येथे 58 वर्षांच्या वृद्ध नराधमाकडून पाच वर्षांच्या दोन अल्पवयीन मुलींचा विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार जळगाव जिल्ह्यातील यावल शहरात घडला आहे. याप्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यावल शहरातील बोरावल गेट भागात नगरपालिकेच्या जलशुद्धीकरण केंद्र परिसरातील एका 58 वर्षांच्या व्यक्तीने पाच वर्षांच्या दोन अल्पवयीन मुलींना घरी बोलावलं. यानंतर त्याने दोघींना विवस्त्र करून त्यांच्यासोबत अश्लिल चाळे केले, तसंच मुलींच्या मनाला लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य करून त्यांचा विनयभंग केला.
ही घटना घडल्यानंतर पीडित अल्पवयीन मुलींनी हा प्रकार आपल्या कुटुंबियांना सांगितला, तेव्हा याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात वृद्ध इसमाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आणि त्याला अटक करण्यात आली.
शहरातील बोरावल गेट परिसरात बोरावल रस्त्यावर नगरपालिकेचे जलशुद्धीकरण केंद्र आहे. या भागात बंडू रीछा बारेला हा 58 वर्षांचा वृद्ध इसम राहतो. या वृद्ध इसमाने दोन पाच वर्षांच्या अल्पवयीन मुलींना त्याच्या घरी बोलावलं. घरात बोलावल्यानंतर त्याने दोन्ही मुलींना विवस्त्र करून त्यांच्यासोबत अश्लिल चाळे केले. यानंतर घाबरलेल्या मुलींनी घरी जाऊन त्यांच्या पालकांना घडलेला प्रकार सांगितला.मुलींनी घडलेली घटना सांगितल्यानंतर त्यांच्या पालकांनी पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतली. यानंतर यावल पोलीस ठाण्यात बंडू बारेला याच्याविरुद्ध बाल लैंगिक अत्याचार संरक्षण कायदा (पोस्को) अंतर्गत गुन्हा दाखल केला गेला, यानंतर पोलिसांनी बंडू बारेला याला अटक केली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक पाराजी वाघमोडे करत आहेत.