
सूर्यपेट : (तेलंगणा) :- आंतरजातीय विवाह केल्यामुळे तरुणीच्या भावाने तरुणाची निर्घृण हत्या केली आहे. ही धक्कादायक घटना तेलंगणातील सूर्यपेट शहरात घडली आहे. पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, हत्येचे कारण आंतरजातीय प्रेमविवाह असल्याचं समोर आलं आहे.या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
सुमारे सहा महिन्यांपूर्वी, कृष्णा उर्फ बंटीने पिल्ललमर्री गावातील भार्गवीशी प्रेमविवाह केला होता. त्यांनी आपला संसार सूर्यापेट गावात थाटला होता. भार्गवीच्या कुटुंबाचा या लग्नाला विरोध होता. त्यांना वेगळे करण्याचे अनेक प्रयत्न तरूणीच्या कुटुंबाने केला होता. याच गोष्टीचा राग मनात धरून भार्गवीच्या भावाने तरुणाची निर्घृण हत्या केली असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.
तलावाजवळ आढळला मृतदेह
घटनेच्या दिवशी, सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास बंटीला त्याच्या मित्र महेशचा फोन आला होता. यानंतर त्याने पत्नीला कळवले आणि तो घराबाहेर निघाला होता. रात्री बंटी घरी परतला नाही. तेव्हा कुटुंबाला काळजी वाटू लागली. दुसर्या दिवशी पिल्ललमर्री तलावाजवळ त्याचा मृतदेह आढळला.मृतदेहाची तपासणी केली असता, मानेवर खुणा आणि शरीरावर जखमा होत्या. पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर त्यांनी घटनास्थळी धाव घेत चौकशी करत गुन्हा दाखल केला आहे. डीएसपी रवी राणा यांनी सांगितले की, ‘आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, लवकरच आरोपींना ताब्यात घेण्यात येईल’.
या घटनेबद्दल बंटीची पत्नी भार्गवी म्हणाली, ‘आम्ही कुटुंबाच्या इच्छेविरोधात लग्न केलं आहे. परंतू आम्हाला आशा होती, वेळेनुसार सगळं काही ठीक होईल. पण तसं झालं नाही, वाटलं नव्हतं बंटीला मारतील’.