अहिल्यानगर : शेतीसाठी घेतलेल्या कर्जाला कंटाळून पाथर्डी तालुक्यातील तुपेवाडी येथील सतीश उर्फ बाळा वांडेकर या 32 वर्षाच्या तरुण शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे. त्यांनी आत्महत्या करण्यापूर्वी एक हृदयद्रावक चिठ्ठी लिहिली आहे.त्यांनी चिठ्ठीत आपल्या वेदना मांडल्या आहेत. तसेच त्यांनी चिठ्ठीत कुणाकडून किती कर्ज घेतलं, याचा तपशील मांडला आहे. एकूण कर्जाचा आकडा त्यामध्ये नमूद केला आहे.
सतीश यांच्यावर खाजगी बँकेचे व खाजगी लोकांचे हात उसने पैसे घेतले होते. झालेला कर्जाचा डोंगर असाह्य झाल्याने वांढेकर यांनी टोकाचे पाऊल उचलून राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. त्यांनी पत्नी रुपाली आणि दोन मुलांसाठी हृदयद्रावक संदेश लिहिला आहे.
सुसाईड नोटमध्ये नक्की काय लिहिलंय?
मी सतीश नामदेव वांढेकर, माझ्यावर खूप कर्ज झालं आहे, त्यामुळे मी आत्महत्या करत आहे. याला कुणीही जबाबदार नाही. मी खूप उद्योग धंदे केले, पण मला यश आलं नाही. मी शेती केली तरीही यश मिळालं नाही. त्यामुळे मी हा निर्णय घेत आहे. माझ्यावर १२ लाख ३९ हजार ८९४ रुपयांचे कर्ज आहे. मी खूप प्रयत्न केला, पण मला यातून बाहेर पडता आलं नाही. शेवटी हा निर्णय घेतला. या कर्जातून बाहेर निघण्यासाठी बायकोनं खूप प्रयत्न केले. तिने आपलं मंगळसूत्र मोडून पैसे दिले, पण कर्जाचा डोंगर इतका होता की, मी यातून बाहेर पडलो नाही.मी माझ्या बायकोचा आणि मुलांचा खूप मोठा गुन्हेगार आहे. मी त्यांच्यासाठी काहीच करू शकलो नाही. मी माझ्या निखीलसाठी साधा बुटही घेऊ शकलो नाही, त्याला १९ फेब्रुवारीला शिवाजी महाराजांचा ड्रेस घ्यायचा होता, पण त्याने मॅडमला सांगितलं माझ्या वडिलांकडे पैसे नाहीत. एवढी दुर्दशा सहन करण्यापेक्षा मेलेलं बरं, म्हणून मी हा निर्णय घेतला.
रुपाली (पत्नी) मला माफ कर, अनुष्का आणि निखील तुम्ही तुमच्या बापाला माफ करा, तुमचा बाप अपयशी ठरला, मुलांना जीव लावा, बहीण-भाऊ मित्र मंडळी माझ्याकडून कुणाचं मन दुखावलं असेल तर माफ करा.