जयपूर :- सासू-सुनेमधील भांडणांबाबत आपण अनेकदा ऐकलंय. सासू-सुनांमध्ये सहसा पटत नाही, असंही म्हटलं जातं. मात्र पोलिसांच्या हाती सासू-सूनेची एक अशी जोडी लागली आहे ज्या भागीदारी करून चोरी करायच्या. जयपूरमधील रेल्वे पोलिसांनी ट्रेनमधील प्रवाशांच्या बॅगमधील दागिने आणि रोख रक्कम चोरणाऱ्या सासू-सुनेलाच्या जोडीला अटक केली आहे. ही सासू-सुनेची जोडी ट्रेनमधील गर्दीचा फायदा घेऊन चोरी करायची आणि तिथून फरार व्हायची.
अटक करण्यात आलेल्या महिलांची ओळख पटली असून, चंदा (५४) आणि तिची सून काजल (२५) अशी त्यांची नावं आहेत. या दोघीही हरयाणामधील टोहना येथील रहिवासी आहेत. १८ फेब्रुवारी रोजी ईश्वर सिंह नावाच्या प्रवाशाने जयपूरहून जोधपूरला जाताना रणथंबोर एक्स्प्रेसमध्ये त्यांच्या पत्नीच्या हँडबॅगमधून सोन्याचे कडे, चैन आणि टॉप्स चोरीला गेल्याची तक्रार दिली होती.
या प्रकरणी तपास करताना पोलिसांनी १०० हून अधिक सीसीटीव्हीची तपासणी केली. तसेच संशयित महिलांचा शोध घेतला. दोन्ही महिला हरयाणामध्ये पसार झाल्याचे पोलिसांना समजले. त्यानंतर पोलिसांनी हरयाणामध्ये जाऊन टोहाना येथून त्यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून चोरी केलेले सुमारे ५ लाख रुपयांचे दागिने जप्त करण्यात आले आहेत.