आज रविवार रोजी एरंडोल येथे ‘राज्यस्तरीय संविधान सन्मान परिषद’चे आयोजन.. राज्यभरातून विविध मान्यवरांची व संविधान प्रेमीची राहणार उपस्थिती.

Spread the love

धरणगाव | प्रतिनिधी –

धरणगाव/एरंडोल : येथे रविवार (दि.१६) रोजी राज्यस्तरीय संविधान सन्मान परिषदेचे आयोजन हॉटेल कृष्णा मैदानावर करण्यात आलेले आहे. नांदेड येथील संविधान चळवळीमध्ये तीन दशकांपेक्षा अधिक काळापासून सक्रिय काम करीत असलेले डॉ.अनंत राऊत हे सदर सविधान परिषदेची अध्यक्षता करणार असून रिपब्लिकन सेनेचे सरसेनानी आनंदराज आंबेडकर साहेब संविधान सन्मान परिषदेचे उद्घाटक म्हणून उपस्थित राहणार आहेत. डॉ.बाबासाहेब आंबेडकर चरित्र साधने प्रकाशन समितीचे सचिव डॉ. प्रदीप आगलावे यांचे “भारतीय संविधानाच्या अंमलबजावणीची दशा आणि दिशा” या विषयावर प्रमुख मार्गदर्शन या संविधान सन्मान परिषदेमध्ये होणार आहे. याबरोबरच प्रमुख मान्यवरांमध्ये राज्याचे पाणी पुरवठा तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील, एरंडोल -पारोळाचे आ.अमोल पाटील, माजी विधानसभा अध्यक्ष अरुणभाई गुजराथी, माजी मंत्री आणि अमळनेरचे आमदार अनिल पाटील, पाचोरा भडगावचे आमदार किशोर पाटील, चोपड्याचे आमदार चंद्रकांत सोनवणे, माजी मंत्री डॉ. सतीश पाटील, यशवंतराव चव्हाण शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अमित पाटील, रिपब्लिकन सेनेचे प्रदेशाध्यक्ष काकासाहेब खंबाळकर, नाशिक येथील समाजभूषण मोहन अढांगळे, बौद्ध साहित्य प्रसार संस्थेचे केंद्रीय अध्यक्ष प्रा. शुक्राचार्य गायकवाड, एनडीएमजेचे महासचिव ॲड.केवल ऊके, समता शिक्षक परिषदेचे संस्थापक अध्यक्ष डी.के. अहिरे, मुकुंद सपकाळे, आनंद बाविस्कर, मुकुंद नन्नवरे, प्रा.अशोक पवार, सुरेश सोनवणे, मिलिंद पवार यासह जिल्ह्यातील तसेच राज्यभरातून अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाची सुरूवात स. ८.०० वा. डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकापासून संविधान बाईक रॅलीचे आयोजनाने होणार आहे. तद्नंतर ९.०० वा.उद्घाटन समारंभाला सुरुवात होणार आहे. यामध्ये संविधान चळवळीमध्ये योगदान देणाऱ्या मान्यवरांना ‘संविधान लढा चेतना पुरस्कार’ देऊन गौरविण्यात येणार आहे. याबरोबरच ‘संविधान निर्माण चित्र प्रदर्शनीचे’ उद्घाटन केले जाणार आहे. जळगाव जिल्ह्यातील संविधानावर लेखन करणाऱ्या लेखकांची पुस्तके सुद्धा या उद्घाटन कार्यक्रमांमध्ये प्रकाशित केले जाणार आहेत. यात प्रा. भरत शिरसाट, वर्षा शिरसाट व डॉ.राहुल निकम यांच्या पुस्तकांचा समावेश आहे.

दिवसभराच्या सत्रांमध्ये एकूण तीन परिसंवादाचे आयोजन करण्यात आलेले आहे. “धर्माधिष्ठित संविधान निर्मितीचा प्रयत्न हा भारताच्या सार्वभौमत्वाला व अखंडतेला एक मोठा धोका आहे”, हा प्रथम परिसंवाद असून याची अध्यक्षता मुंबई उच्च न्यायालयाचे जेष्ठ वकील ॲड.संघराज रुपवते करणार आहेत. या सत्रामध्ये जळगाव जिल्ह्यातील साहित्यिक जयसिंग वाघ तसेच वंचित बहुजन आघाडी युवा विभागाच्या राज्य सदस्या शमीभा पाटील या परिसंवादात वक्ते असणार आहेत. भारतीय संविधानाला अपेक्षित सामाजिक व आर्थिक समता प्रस्थापित झाली आहे काय? या दुसऱ्या परिसंवादाची अध्यक्षता प्रा. डॉ. श्रीरंजन आवटे, पुणे करणार आहेत. प्रा. नुरखाॅ पठाण, महाड व चोपडा समाजकार्य महाविद्यालयाचे डॉ.राहुल निकम वक्ते म्हणून असणार आहेत. “भारतीय संविधानाला अपेक्षित स्त्री पुरुष समानता आणि देशातील स्री- व्यक्ती स्वातंत्र्याचा प्रश्न: एक गंभीर चिंतन” हा परिसंवादाचा तिसरा विषय असून किरणजी सोनवणे, ज्येष्ठ पत्रकार आणि विचारवंत, कल्याण हे या परिसंवादाची अध्यक्षता करणार आहेत. नागपूर येथील संत तुकडोजी महाराज विद्यापीठच्या डॉ. सरोज डांगे आणि धनदाई महाविद्यालय अमळनेरचे डॉ. लीलाधर पाटील या परिसंवादात वक्ते म्हणून असणार आहेत. सायं. ७.०० वाजेच्या सत्रामध्ये संविधान कवी संमेलनाचे आयोजन करण्यात आले असून डोंबिवली येथील प्रा. शुक्राचार्य गायकवाड सदर कवी संमेलनाचे अध्यक्ष असणार आहेत. चिखली येथील ॲड.विजयकुमार कस्तुरे या संविधान कवी संमेलनाचे उद्घाटन करणार आहेत. या कवी संमेलनात राज्यभरातून ३० पेक्षा अधिक कवींचा सहभाग असणार आहे.

यासोबतच संविधान मूल्ये जनजागृती संघाची स्थापना या परिषदेमध्ये केली जाणार आहे. तसेच संविधान मूल्य जनजागृती राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय पुरस्काराचे वितरण सुद्धा या कार्यक्रमात केले जाणार आहे. एकूण ४५ पुरस्काराचे वितरण या संविधान सन्मान परिषदेमध्ये केले जाणार आहे. या सोबतच दुपारच्या सत्रात सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. राज्यस्तरीय संविधान सन्मान परिषदे करिता संयोजन समिती, महिला समिती, संविधान रॅली समिती, शिक्षक समिती, अर्थ समिती, प्रसिद्धी समिती अशा विविध समित्यांच्या माध्यमातून नियोजन करण्यात आले आहे. एरंडोल येथील माजी उपनगराध्यक्ष शालिग्राम गायकवाड हे सदर संविधान सन्मान परिषदेचे स्वागताध्यक्ष असणार आहेत. सदर राज्यस्तरीय संविधान सन्मान परिषद हि खानदेशातील पहिलीच राज्यस्तरीय संविधान सन्मान परिषद असल्याची माहिती या संविधान सन्मान परिषदेचे मुख्य संयोजक तसेच संयोजन समितीचे प्रमुख प्रा. भरत शिरसाठ यांनी दिली आहे. या संविधान परिषदे करिता ४० पेक्षा अधिक सभा घेण्यात आल्या असून राज्यभरातून साधारणतः ३ हजार लोकांची उपस्थिती या संविधान सन्मान परिषदेला असणार आहे. राज्यभरातून साहित्यिक, विचारवंत, संविधान अभ्यासक व संविधान चळवळीतील कार्यकर्ते या परिषदेला उपस्थिती देणार आहेत. सर्व स्तरावरील नियोजन झाले असून सदर संविधान परिषद ही ऐतिहासिक ठरणार असल्याची माहिती मुख्य संयोजक प्रा. भरत शिरसाठ यांनी दिली आहे.

मुख्य संपादक संजय चौधरी