महिलेच्या पर्समधील ७ लाख ८० रुपये किमतीचे सोने चोरणाऱ्या दोघं महिलाना अमळनेर पोलिसांनी केली अटक.

Spread the love

पोलिसांनी सात दिवस एकाच कपड्यावर मिळेल तसे जेवण करून जंगजंग पछाडुन मोठ्या परिश्रमानंतर केली कौतुकास्पद कामगिरी.

अमळनेर :- बसमधून महिलेचे ९ तोळे सोने लांबवणाऱ्या चोरट्या महिलांना अमळनेर पोलिसांनी अमरावती जिल्ह्यातून अटक केली. त्यांच्याकडून ७ लाख ८० हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.दरम्यान, या महिला राज्यभरातील विविध जिल्ह्यात तसेच मध्य प्रदेशमध्ये चोरी करण्यात पटाईत असल्याचे दिसून आले आहे. याबाबत असे की, धरणगाव तालुक्यातील गारखेडा येथील प्रतिभा जिजाबराव पाटील (वय ४८, रा. गारखेडा, ता. धरणगाव) ६ मार्चला शिंदखेडा तालुक्यात लग्नासाठी धरणगावहून जळगाव-दोंडाईचा बसमध्ये प्रवास करीत होत्या. दुपारी दोनच्या सुमारास पैलाड नाक्यावर त्यांच्याशेजारी बसलेल्या दोन महिला उतरल्या. प्रतिभा पाटील यांनी आपल्या पर्समधील दागिने तपासले असता, ते गायब झाल्याचे समजले.

प्रतिभा पाटील यांनी पोलिस ठाणे गाठून घडलेली घटना परिवीक्षाधीन डीवायएसपी केदार बारबोले यांना सांगितली. त्यांनी क्षणाचा विलंब न करता पैलाड नाक्यावर पथक पाठविले. पथकाने पैलाड नाक्यावरील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता, त्या महिला दुसऱ्या बसमधून परत जाताना दिसल्या. केदार बारबोले यांनी पोलिस उपनिरीक्षक नामदेव बोरकर, हवालदार मिलिंद सोनार, विनोद संदानशिव, प्रशांत पाटील, नीलेश मोरे, उज्ज्वलकुमार म्हस्के, महिला होमगार्ड नीलिमा पाटील यांना रवाना केले.चोरट्या महिला जळगावला गेल्याचे समजताच पोलिसांनी जळगाव बसस्थानक गाठले. तेथील फुटेज तपासले असता, त्या रिक्षातून निघून गेल्या. त्या महिला कुसुंबा विमानतळच्या बाजूला बस्तान मांडून बसल्याची माहिती मिळाली. पोलिस तेथे पोहोचेपर्यंत त्यांनी पोलिसांना गुंगारा दिला होता. मात्र, जळगाव येथून त्या आपले गाठोडे बांधून भाड्याच्या गाडीत जाताना फुटेजमध्ये आढळल्या. पोलिसांनी त्या गाडी क्रमांकावरून शोध घेऊन माहिती काढली असता, त्यांना अकोला येथे सोडण्यात आले होते.

घरून निघालेल्या पोलिसांना माघारी फिरणे शक्य नव्हते. ते तसेच पुढे तपासाला निघाले. पोलिसांच्या दोन गाड्या अकोला येथे पोहोचल्या. त्यादरम्यान जळगावचे पोलिस पंकज खडसे, कुंदनसिंग बयस, गौरव पाटील, मिलिंद जाधव यांची तांत्रिक मदत घेतली. अकोला येथून त्या चोरट्या महिला बार्शी टाकळी पोहोचल्या होत्या. पोलिस त्यांच्या मागोमाग गेले, तर त्या महिला परत अकोला येथे आल्या होत्या. अकोला येथे पुन्हा फुटेज तपासले, तर त्या महिला परतवाडा येथे गेल्याची माहिती मिळाली. परतवाडा बसस्थानकापुढे त्या एका रिक्षात निघून गेल्याचे दिसत होते.रिक्षा शोधणे मोठे जिकिरीचे काम होते. अखेर बराच काळ उलटल्यावर रिक्षा सापडली. रिक्षाचालकाकडून माहिती घेतली असता, त्याने त्या महिलांना महामार्गाच्या चौफुलीवर उतरवून माघारी फिरला होता. तेथून त्या महिला नेमक्या कोठे गेल्या, याचा तपास लागत नव्हता. तांत्रिक माहितीने त्या महिला अंजनगाव येथे गेल्याचे समजले. पोलिस त्यांच्या मागावर होते. त्यांच्यात दिवसाचे अंतर पडल्याने त्या तिगावमार्गे पांडुरणा, इंदूर पुन्हा तिगावला परत आल्याची माहिती मिळाली. तेथून त्या वरूड (जि. अमरावती) येथे पोहोचल्याची माहिती मिळाली. या महिलांचा रस्त्यावरच ठिकाणा असल्याने त्यांचा शोध घेणे अवघड जात होते.

शोध घेण्यासाठी पोलिसांनी सात दिवस एकाच कपड्यावर मिळेल तसे जेवण करून जंगजंग पछाडले होते. एक, दोन, चार नव्हे, तर तब्बल ३५० सीसीटीव्ही फुटेज त्यांनी तपासले होते. वरूड येथे त्यांना शोधण्यासाठी पोलिस भटकत होते. तांत्रिक मदतीने त्या महिला नेमक्या कुठे आहेत, याची माहिती मिळत नव्हती. एका मोठ्या झाडाच्या खाली सावलीत त्या महिला निवांत झोपलेल्या दिसल्या आणि पोलिसांनी त्यांच्यावर झडप घातली. चोरट्या दोन महिलांसोबत त्यांच्या टोळीतील आणखी दोन महिलाही त्यांच्यासोबत आढळून आल्या. चौघांना ताब्यात घेऊन अमळनेर पोलिसठाण्यात आणले.

मुख्य संपादक संजय चौधरी