हैदराबाद :- आधी मुलगा आणि मुलीची गळा घोटून हत्या केल्यानंतर आई-वडिलांनी स्वत:ही गळफास लावून जीवन संपवलं आहे. या जोडप्याने आधी अल्पवयीन मुलांची हत्या केली आणि त्यानंतर स्वत: गळफास लावून घेतला.तेलंगणाची राजधानी असलेल्या हैदराबादमध्ये ही खळबळजनक घटना घडली आहे. सोमवारी रात्री उस्मानिया विद्यापीठ पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या हबसीगुडा येथील रवींद्र नगर कॉलनीतील घरात पोलिसांना चार मृतदेह आढळून आले.
चंद्रशेखर रेड्डी (44), त्यांची पत्नी कविता (35), मुलगा विश्वन रेड्डी (10) आणि मुलगी श्रीता रेड्डी (15) अशी मृतांची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चंद्रशेखर रेड्डी आणि त्यांची पत्नी कविता यांनी प्रथम त्यांच्या मुलाची आणि मुलीची गळा दाबून हत्या केली आणि नंतर स्वतःला गळफास लावून घेतला.
श्रीता रेड्डी ही नववीत शिकणारी विद्यार्थिनी होती आणि विश्वन रेड्डी पाचवीत शिकत होता. डायल 100 वर फोन आल्यानंतर पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांना चंद्रशेखर आणि त्यांच्या पत्नीचा मृतदेह वेगवेगळ्या खोलीमध्ये सापडला. तर मुलं बेडवर मृतावस्थेत पडली होती.
पोलिसांना चिठ्ठीही सापडली
चंद्रशेखर रेड्डी यांनी मृत्यूआधी लिहिलेली चिठ्ठीही पोलिसांना सापडली आहे. कुटुंबाच्या मृत्यूसाठी कोणीही जबाबदार नाही, माझ्याकडे माझं कुटुंब संपवण्याशिवाय कोणताही पर्याय नव्हता, मला माफ करा. मी माझ्या करिअरमध्ये संघर्ष करत आहे. मी मानसिक आणि शारिरिकदृष्ट्या त्रस्त आहे. मला मधुमेह, मज्जातंतू आणि मूत्रपिंडाशी संबंधित समस्या आहेत, असं चंद्रशेखर रेड्डी यांनी या चिठ्ठीमध्ये लिहिलं आहे.
पोलिसांनी चौघांचेही मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी गांधी रुग्णालयात पाठवले आणि तपास सुरू केला आहे. रेड्डी कुटुंब मूळचे महबूबनगर जिल्ह्यातील कलवाकुर्तीमधील होते, तसंच एका वर्षापूर्वी ते हैदराबादमध्ये आले होते, असं पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आलं आहे.
कुटुंब आर्थिक अडचणीत
चंद्रशेखर रेड्डी यांनी काही महिने एका खाजगी महाविद्यालयात ज्युनियर लेक्चरर म्हणून काम केले. यानंतर सुमारे सहा महिने ते बेरोजगार राहिले. उत्पन्नाचा कोणताही स्रोत नसल्याने कुटुंबाला आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत होता. सध्या पोलिसांनी संशयास्पद मृत्यूचा गुन्हा दाखल केला असून पोस्टमॉर्टम रिपोर्टनंतर मृत्यूचं खरं कारण समोर येईल, असं पोलिसांनी सांगितलं आहे.
Disclaimer : जर तुमच्या मनात आत्महत्येचा विचार आला तर तुम्ही मानसोपचारतज्ज्ञांशी बोलून तुमच्या समस्येवर उपाय शोधू शकता. यासाठी 14416 हा हेल्पलाइन नंबर आहे, जिथे तुम्ही 24X7 संपर्क साधू शकता. याशिवाय, इतर अनेक हेल्पलाइन नंबर आहेत जिथे तुम्ही संपर्क साधू शकता. सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालय हेल्पलाइन – 1800-599-0019 (13 भाषांमध्ये उपलब्ध) मानवी वर्तणूक आणि संबंधित विज्ञान संस्था – 9868396824, 9868396841, 011-22574820 हितगुज हेल्पलाइन, मुंबई – 022- 24131212, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मेंटल हेल्थ न्यूरो सायन्स – 080 – 26995000