जळगाव तालुक्यात भरदिवसा माजी उपसरपंचावर चाकू आणि चॉपरने वार करून केली निघृण हत्या.घरच्यांचा आक्रोश.

Spread the love

जळगाव :- बीडमध्ये मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाने राज्यातलं वातावरण तापलं आहे. त्यातच आता जळगाव जिल्ह्यातील कासनवाडा गावात शिवसेना शिंदे गटाच्या माजी उपसरपंचाची निर्घृण हत्या करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. जळगावातील कानसवाडा गावच्या माजी उपसरपंचाची निर्घृण हत्या करण्यात आली.युवराज कोळी हे सकाळी आपल्या शेतात गेले असताना तीन ते चार जणांनी त्यांच्यावर धारदार शस्त्राने हल्ला करत त्यांची निर्घृण हत्या केली आहे. या घटनेमुळे जळगाव जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली असून घटनेनंतर माजी उपसरपंचाचा मृतदेह हा जिल्हा रुग्णालयात आणण्यात आला व जिल्हा रुग्णालयात नातेवाईकांनी एकच आक्रोश केला.

उपसरपंच असताना गावात चांगले काम करत असल्याने त्याचा राग धरून युवराज कोळी यांची हत्या करण्यात आल्याचा गंभीर आरोप त्यांच्या बहिणीने केला असून हत्या करणाऱ्या आरोपींकडून मुलांना व आपल्या जीवाला धोका असल्याचा आरोप मृत युवराज कोळी यांच्या पत्नीने केला आहे. याप्रकरणी नशिराबाद पोलीस स्टेशनमध्ये खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून एका संशयिताला पोलिसांनी अटक केली असून दोन संशयित अद्याप फरार आहेत. या घटनेची माहिती मिळताच मंत्री गुलाबराव पाटील त्यांनी देखील जिल्हा रुग्णालयात जाऊन नातेवाईकांचे सांत्वन केले.

चाकू आणि चॉपरने वार करत हत्या

गावातीलच तिघांनी आज (दि. 21) सकाळी आठ वाजेच्या सुमारास युवराज कोळी यांच्यावर हल्ला चढविला. चाकू आणि चॉपरने त्यांच्यावर वार चढवल्याने ते जागीच कोसळले. जळगाव शासकीय व वैद्यकीय महाविद्यालयात युवराज कोळी यांचा मृतदेह आणण्यात आला असून नातेवाईकांनी प्रचंड आक्रोश केला आहे. कानसवाडा गावासह जिल्हा रुग्णालयात तणावाचे वातावरण असून खुनाचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही.

…. तर युवराज कोळींचा जीव वाचला असता

बीडमधील सरपंच संतोष देशमुख यांच्या त्या प्रकरणात पोलिसांनी तातडीने कारवाई केली असती तर कदाचित जळगावमधील उपसरपंचाची हत्या झाली नसती अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या नेत्या रोहिणी खडसे यांनी दिली. तसेच राज्यात पोलिसांचा धाक हा राहिला नसून महाराष्ट्राचा बिहार झाल्याचा आरोपही रोहिणी खडसे यांनी केला आहे. या घटनेत नेमकी हत्या कशामुळे झाली याचे कारण अद्याप समोर आलेले नसून झालेली घटना ही अत्यंत दुर्दैवी असल्याची प्रतिक्रिया मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली आहे.

मुख्य संपादक संजय चौधरी