
अमळनेर – गडखांब ते दहिवद रस्त्याच्यामध्ये दुपारी दोन वाजेच्या सुमारास अज्ञात वाहनाच्या धडकेने काळवीट ठार झाल्याची घटना घडली.
उन्हाची वाढती तीव्रता ही मुक्या प्राण्यांसाठी घातक ठरणारी असते. पाण्याच्या शोधात असलेले वन्यजीव गावाच्या दिशेने किंवा रस्त्याच्या दिशेने फिरत असतात. अशाच भर दुपारच्या उन्हात पाण्याच्या शोधात असलेले एक वयस्क काळवीट गडखांब ते दहिवद रस्त्याच्यामध्ये आज मंगळवार दि. १९ रोजी अज्ञात वाहनाच्या जोरदार धडकेने ठार झाले. तोंडाला आणि कमरेला जबर मार लागल्याने काळवीट मृत झाले.
स्थानिक नागरिकांच्या सदर मृत काळवीट नजरेस पडले. त्यांनी लागलीच वनपाल पी. जे. सोनवणे यांच्याशी दूरध्वनीने संपर्क साधत माहिती दिली. त्यांनी तात्काळ वन कर्मचारी पाठवत मृत काळवीट ताब्यात घेऊन शव विच्छेदन करून मृत काळवीटवर अंत्यसंस्कार केल्याची माहिती वनपाल सोनवणे यांनी दिली.