कळवण :- मध्ये एका ग्रामसेवकाच्या पत्नीने विष प्राशन करत आत्महत्येचा प्रयत्न केला. आमदार नितीन पवार आपल्या पतीला वारंवार त्रास देत असल्याचा आरोप महिलेने केला. आपल्या ग्रामसेवक पतीला विविध तक्रारी करून आणि अधिवेशनात पतीविरोधात लक्षवेधी मांडण्याचा प्रस्ताव टाकून आमदार नितीन पवार त्रास देत असल्याचं महिलेचं म्हणणं आहे.विधानसभा निवडणुकीत आपण विरोधात काम केल्याचा राग काढत असल्याचं महिलेने तक्रारीत म्हटल तर महिलेने केलेल्या आरोपात कुठलंही तथ्य नसल्याचं म्हणत आमदार पवारांनी आरोप फेटाळून लावले आहेत.कळवणचे आमदार नितीन पवार व त्यांच्या पत्नी जयश्री पवार ह्या कोणत्या ना कोणत्या कारणाने खोट्या तक्रारी दाखल करतात. त्यातून ते नेहमी त्रास देत आले आहेत. शिवाय ग्रामसेवक असलेल्या पतीला ही त्रास देतात, असा आरोप शीतल महाजन यांनी केला आहे. शीतल या काँग्रेसच्या पदाधिकारी आहेत. या त्रासाला कंटाळून त्यांनी अखेर विषारी औषध घेवून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. कळवणमध्ये ही घटना घडली.
आत्महत्येचा प्रयत्न करण्या पूर्वी शीतल महाजन यांनी एक चिठ्ठी लिहून ठेवली होती. त्यात त्यांनी आमदारांवर गंभीर आरोप केले आहेत. आमदार नितीन पवार व जयश्री पवार यांच्या विरोधात काम केल्यामुळे ग्रामसेवक असलेल्या पतीला त्रास दिला जात आहे. त्यांच्या विरोधात खोट्या तक्रारी करून त्यांना अडकवण्याचा प्रयत्न आमदार करत आहेत असा आरोप त्यांनी केला आहे. मात्र अनेक वेळा चौकशी होऊनही त्यांच्या तक्रारीत तथ्य आढळलेले नाही. तरीही त्रास सुरूच होता, असं ही त्या सांगतात.आता तर आमदार नितीन पवार यांनी विधानसभेत लक्षवेधी उपस्थित करत ग्रामसेवक रामराव महाजन यांच्यावर कारवाईची मागणी केली आहे. त्याच त्रासाला कंटाळून शीतल महाजन यांनी विषारी औषध घेऊन स्वतःला संपविण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप शीतल महाजन यांचे बंधू योगेश गायकवाड यांनी केला आहे.
तसा तक्रार अर्ज त्यांनी अभोणा पोलिस स्थानकात दाखल केला आहे. त्यामुळे आमदार नितीन पवार यांच्याही अडचणी वाढण्याची शक्यता आहे.दरम्यान याबाबत आमदार नितीन पवार यांनी सांगितले की संबंधित महिलेच्या पति विरोधात मी लक्षवेधी टाकलेली आहे. घरकुल प्रकरणात त्यांनी गैरव्यवहार केला आहे हे आपण लक्षवेधीत म्हटलेलं आहे. मी कोणताही दबाव वगैरे किंवा त्रास त्या महिलेला दिलेला नाही, असे स्पष्टीकरण आमदार नितीन पवार यांनी दिले आहे. पवार हे अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार आहेत.






