धुळे :- बीएस्सीचं शिक्षण पूर्ण केलं. भारतीय लष्करात भरती होऊन देशसेवेचं स्वप्न पाहिलं होतं. दोन गुण कमी पडले अन् आर्मीत भरती होण्याची संधी हुकली.या नैराश्यातून २१ वर्षीय तरुणाने गळफास घेत जीवन संपवल्याची घटना समोर आली आहे. अक्षय यशवंत माळी (वय-२१, रा. रामी, जि- धुळे) असे या तरुणाचे नाव असून या घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त होत आहे. ही घटना २५ मार्चला पहाटे ५.३० वाजताच्या सुमारास घडली. जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी माळी कुटुंबाची भेट घेऊन सांत्वन केले.
या बाबत माहिती अशी अक्षय माळी असं या तरुणाचं नाव आहे. अक्षय B.sc ची शिक्षण घेत होता. तर दुसरीकडे आर्मीमध्ये भरती होण्याची तयारी देखील करत होता. अक्षयने यंदा आर्मीची परीक्षा दिली होती. मात्र अवघ्या 2 गुणांची त्याची संधी हुकली. मात्र हे अपयश अक्षयच्या जिव्हारी लागलं, त्यामुळे त्याने जीवन संपवण्याचा टोकाचा निर्णय घेतला.अक्षयने रामी गावालगत मोडळ नदी परिसरातील शेतात दोरीच्या सहाय्याने गळफास घेत आत्महत्या केली. ही बाब लक्षात येताच कुटुंबीयांनी त्याला उपचारासाठी हिरे वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले. मात्र तिथे डॉ. विद्या गायकवाड यांनी अक्षयला मृत घोषित केले. याबाबत सोनगीर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
पोलीस अधीक्षकांनी घेतली माळी कुटुंबियांची भेट…..
दरम्यान, अक्षय माळी याच्या आत्महत्येनंतर जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी माळी कुटुंबाची भेट घेऊन सांत्वन केले. अक्षय माळी याची आत्महत्या मला अस्वस्थ करून गेली आहे, अशा भावना जिल्हा पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी व्यक्त केल्या. अक्षयचे वडील यशवंत माळी हे शेतकरी आणि माळकरी असून, मुलाच्या दु:खाने ते कोसळले आहेत. मुलाचा चेहरा सतत डोळ्यासमोर येतो, दोन दिवसांपासून झोप लागत नाही, असे सांगताना त्यांचे हुंदके आवरत नव्हते. मी कधी त्याला शेतात कष्ट करायला पाठवले नाही. हवे ते शिक, असेच नेहमी सांगत होतो. मात्र, आज त्यालाच खांद्यावर उचलावे लागले, या शब्दांत त्यांनी हुंदके देत आपल्या भावना एसपी धिवरे यांच्याकडे व्यक्त केल्या. या घटनेमुळे धुळे जिल्ह्यात हळहळ व्यक्त केली जात आहे.






