Viral Video:- ग्रेटर नोएडाच्या नॉलेज पार्क-3 परिसरातील अन्नपूर्णा गर्ल्स हॉस्टेलमध्ये गुरुवारी संध्याकाळी भीषण आग लागली. या दुर्घटनेने हॉस्टेलमधील 160 हून अधिक विद्यार्थिनींमध्ये भीतीचे वातावरण निर्माण केले.आग लागण्याचे मुख्य कारण एसीचा स्फोट असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.
विद्यार्थिनींचा संघर्ष आणि जीव वाचवण्याची धडपड…..
आग लागताच हॉस्टेलमधील विद्यार्थिनींनी सुरक्षित बाहेर पडण्याचा प्रयत्न केला. परंतु, धूर आणि आगीमुळे मार्ग अडल्याने काही विद्यार्थिनींनी जीव वाचवण्यासाठी दुसऱ्या मजल्यावरून खाली उड्या मारल्या. सोशल मीडियावर या घटनेचे धक्कादायक व्हिडिओ व्हायरल झाले आहेत, ज्यामध्ये विद्यार्थिनींची घाईगडबड आणि भीती स्पष्ट दिसते.
अग्निशमन दलाच्या विलंबित कारवाईवर प्रश्नचिन्ह….
स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, घटनास्थळी अग्निशमन दल वेळेवर पोहोचण्यात अपयशी ठरले. सूचना मिळाल्यानंतरही अग्निशमन यंत्रणा उशिरा पोहोचली, त्यामुळे विद्यार्थिनींना स्वतःच्या जीवावर उदार होऊन इमारतीतून उड्या माराव्या लागल्या. मात्र, अग्निशमन विभागाने वेळेत आगीवर नियंत्रण मिळवले आणि मोठी जीवितहानी टळली.
हॉस्टेलला आवश्यक परवानग्या होत्या का?…..
या दुर्घटनेनंतर प्रशासनाने हॉस्टेलच्या अग्निसुरक्षेच्या नियमांचे उल्लंघन झाले का, याची चौकशी सुरू केली आहे. हॉस्टेलला फायर सेफ्टी विभागाकडून आवश्यक परवानग्या मिळाल्या होत्या का, याचा तपास केला जात आहे. जर कोणत्याही प्रकारची दुर्लक्ष किंवा लापरवाही आढळली, तर हॉस्टेल व्यवस्थापनावर कारवाई केली जाईल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.
विद्यार्थिनींच्या सुरक्षेवर गंभीर प्रश्न…..
या घटनेनंतर पालक आणि विद्यार्थिनींमध्ये अस्वस्थता पसरली आहे. हॉस्टेलमध्ये पुरेशा सुरक्षा सुविधा नव्हत्या का, अग्निशमन उपकरणे कार्यान्वित होती का, यासारख्या अनेक प्रश्नांवर चर्चा सुरू झाली आहे. अनेक विद्यार्थिनींनी सांगितले की, आगीच्या वेळी सुरक्षित मार्ग नव्हते आणि त्यांना इमारतीत अडकून पडावे लागले.






