देहराडून :- लग्नसोहळ्यामध्ये राग-लोभ सुरुच असतात. काही परंपरा शेकडो वर्षांपासून सुरु आहेत. नवरदेवाचे बूट लपवून ठेवायचे, ही त्यातलीच एक प्रथा. परंतु या प्रथेमुळे उत्तर प्रदेशात भलतीच घटना घडली.त्यामुळे हे प्रकरण थेट पोलिस ठाण्यापर्यंत पोहोचलं. देहराडूनच्या चकरौता येथून मोहम्मद साबिर यांचं लग्न बिजनौरच्या गढमलपूर येथील मुलीशी जमलं. सगळंकाही व्यवस्थित सुरु होतं. वरात निघाली, घोड्यावर नवरदेव बसला, नाचगाणं सुरु झालं.. परंतु नवरदेवाचा बुट चोरला आणि सगळं बिनसलं.
मेहुणीने प्रथेप्रमाणे नवरदेवाचे बूट चोरले आणि थेट ५० हजार रुपयांची मागणी केली. नवरदेवसुद्धा तयारीचाच होता. म्हणाला, ५ हजार रुपयांमध्ये मिटवून घे. हे ऐकून मेव्हणी जाम चिडली. तिने भांडणच काढलं. मग काय, शूज राहिलं बाजूलाच काठ्याच निघाल्या. नवरीकडच्या महिलांनी नवरदेवाला ‘भिकारी टाईप’ म्हटलं. उत्तरामध्ये नवरदेवाच्या घरच्यांनी म्हटलं, आम्हाला मुलीऐवजी पैसे पाहिजेत का? वाद एवढा वाढला की, दोन गटामध्ये तुंबळ मारामारी झाली. लाठ्या-काठ्या निघाल्या, नवरदेवाच्या नातेवाईकांना खोलीत कोंडून ठेवलं.एक्सवर हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
व्हिडीओमध्ये नवरदेव सगळी हकीकत सांगत आहे. या घटनेनंतर नाराज झालेल्या नवरदेवाने नवरीला सोबत नेण्यास नकार दिला. त्यानंतर एकाने पोलिसांना फोन केला. पोलिस घटनास्थळी पोहोचले आणि वातावरण शांत करण्याचा प्रयत्न केला. दोन्ही बाजूच्या लोकांना पोलिसांनी उचलून ठाण्यात नेलं. तिथे बराचवेळ बातचित झाल्यानंतर प्रकरण मिटलं आणि मागचं सगळं विसरण्याचं ठरलं. पोलिसांच्या मध्यस्थीने दोन्ही कुटुंब पु्न्हा एकत्र आले.