फूलंब्री :- पंचायत समिती कार्यालय अंतर्गत असणाऱ्या घरकुल योजनेत इंजिनिअर व अधिकारी पैशाची मागणी करत असल्याने तालुक्यातील गेवराई पायगाचे सरपंच मंगेश साबळे यांनी भिकार्याचे सोंग घेऊन पंचायत समिती कार्यालयासमोर गुरुवारी (ता.आठ) अनोखे आंदोलन करत सर्वांचेच लक्ष वेधून घेतले.त्यांच्या या अनोख्या आंदोलनाने जाणाऱ्या – येणाऱ्या नागरिकांनी भिकारी समजून भीक दिल्याचा प्रकार दिसून आला.
राज्यभर आपल्या अनोख्या आंदोलनाने प्रसिद्ध असलेले फुलंब्री तालुक्यातील गेवराई पायगाचे सरपंच मंगेश साबळे यांनी पुन्हा एकदा आपल्या शैलीत भिकाऱ्याचे सोंग घेऊन भीक मागत अनोखे आंदोलन करून सर्वांचेच लक्ष वेधून घेतले. पंचायत समितीत घरकुल योजनेत काम होत नसल्याची भावना त्यांनी यावेळी बोलून दाखवली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गोरगरीब जनतेला घर नसल्याने घरकुल मंजूर केले. परंतु पंचायत समितीतील इंजिनियर व अधिकारी गोरगरीब जनतेकडे पैशाची मागणी करतात. पैसे दिले नाही तर त्यांचे घरकुलाचे पैसेही मिळत नाही.
त्यामुळे अशा परिस्थितीत गरिबांनी करायचे काय.? हा प्रश्न उपस्थित राहतो. परिणामी पंचायत समिती कार्यालयासमोर फाटके कपडे, तुटकी खुर्ची खांद्यावर, चिखलाने भरलेले अंग, फाटलेल्या चपला व बुटांची माळ, हातात भिकेचे कटोरे घेऊन आगळीवेगळी वेशभूषा परिधान करून पंचायत समिती कार्यालयासमोर येणाऱ्या जाणाऱ्याला भीक मागितली. अधिकारी पैसे घेतल्याशिवाय काम करत नसल्याची खंत सरपंच मंगेश साबळे यांनी बोलून दाखवली. सकाळी 11 वाजेपासून दुपारी एक वाजेपर्यंत पंचायत समिती परिसर, पोलीस ठाणे परिसर, आणि तहसील परिसरात भिक मागो आंदोलनाने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले होते.
मला फासावर द्या, गोळ्या घाला….
पंचायत समिती कार्यालयासमोर अनोखी भिकाऱ्याची वेशभूषा परिधान करून सरपंच मंगेश साबळे यांनी पोलीस ठाणे गाठून पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना भीक मागितली. भीक मागणे गुन्हा असेल तर मला फासावर लटका, गोळ्या घाला, मी स्वतः येत नसतो मला पकडून न्या असे सरपंच मंगेश साबळे यांनी पोलिसांना ठणकावून सांगितले. दरम्यान पोलिसांची व सरपंच मंगेश साबळे यांची थोडी बाचाबाची देखील झाली.
अंगणवाडी भरतीत पैशाच्या मागणीचा आरोप….
फुलंब्री तालुक्यातील 104 मदतनीस भरती करण्यात आली. या अंगणवाडी भरतीमध्ये अंगणवाडी मदतनीस व सेविकेकडे पैशाची मागणी सीडीपीओ कार्यालयातून केली असल्याचा आरोप देखील यावेळी सरपंच मंगेश साबळे यांनी केला.
साबळेची भिकेसाठी नागरिकांना साद….
•विभागीय आयुक्तच्या नावाने दे..ग..माय.!
•जिल्हाधिकाऱ्याच्या नावाने दे ग माय.!
•सीईओच्या नावाने दे ग माय.!
•बीडिओ च्या नावाने दे ग माय.!
•घरकुल इंजिनीयरच्या नावाने दे ग माय.!
गेवराई पायगा येथे 60 घरकुले मंजूर असून सर्व लाभार्थ्यांना पहिला हप्ता वितरित करण्यात आला आहे. बेसिमेंट लेव्हलचे काम पूर्ण झाल्यानंतर दुसरा हप्ता वितरित करण्यात येतो. संबंधितांनी सहा घरकुल लाभार्थ्यांना दुसरा हप्ता वितरित करण्याच्या अनुषंगाने आंदोलन केले आहे. दुसऱ्या हप्ताची मागणी केलेल्या लाभार्थीचे घराचे काम जुने असल्याने त्यावर दुसरा हप्ता वितरित करता येत नाही. त्यामुळे अभियंता पैशाची मागणी करतो हे म्हणणे चुकीचे आहे.
– उषा मोरे, गटविकास अधिकारी फुलंब्री…..
अंगणवाडीमध्ये शासनाने ठरवून दिलेल्या शासन निर्णयाप्रमाणे अंगणवाडी सेविका व मदतनीची भरती झालेली आहे. शैक्षणिक आहरतेनुसार शासनाने गुण ठरवून दिलेले आहे. त्याच पद्धतीने सदरील भरती करण्यात आलेली आहे.
– मनीषा कदम, प्रकल्प अधिकारी, महिला व बालकल्याण…..
फुलंब्री पंचायत समिती अंतर्गत असणाऱ्या घरकुल योजनेत असणारे इंजिनियर ग्रामीण भागात शेतकऱ्यांच्या घरकुलाचा फोटो काढत्यावेळी पैशाची मागणी करतात. पैसे दिले तर त्यांचा हप्ता वितरित होतो. पैसे दिले नाही तर घरकुलाचे पैसे मिळत नाही. अंगणवाडी भरतीतही पैशाची मागणी झाली. त्यामुळे पैसे मागणाऱ्या अधिकाऱ्यांना पैसे देण्यासाठी हे अनोखे भिक मागो आंदोलन करावे लागले.
– मंगेश साबळे, सरपंच गेवराई पायगा…..