बिलासपूर (छत्तीसगड) :- येथे एक धक्कादायक घटना समोर आली आहे. अमेरी येथील मॅरेज ब्युरो चालवणाऱ्या महिलेने एका क्लाएंटचं लग्न तिच्याच पतीशी लावून दिलं. चित्रा चौधरी या महिलेने पती संजय चौधरीचं प्रोफाईल मुलीला पाठवलं आणि नंतर लग्न लावून दिलं. जंजगीर-चंपा येथील रहिवासी असलेली दमयंती चौधरी जुलै २०२४ मध्ये लग्नासाठी मॅरेज ब्युरोमध्ये आली होती. सुरुवातीला तिला अनेक प्रोफाईल पाठवण्यात आले. पण तिला एकही प्रोफाईल आवडलं नाही.
चित्राने तरुणीला पतीचं प्रोफाईल पाठवलं. त्यांचं लग्न झालं. त्यानंतर संजय मुलीला हरियाणाला घेऊन गेला आणि ११ महिने एकत्र राहिला. नंतर दोघेही बिलासपूरमधील भाड्याच्या घरात राहायला गेले. याच दरम्यान संजयने आजार, गरज आणि आपत्कालीन परिस्थितीचं कारण सांगून तरुणीकडून ७ लाख रुपये वसूल केले आणि तिच्या पैशातून एक कार देखील खरेदी केली. एके दिवशी संजय अचानक गायब झाला. त्यानंतर दमयंतीला समजलं की, ज्या पुरुषाशी तिचं लग्न झालं होतं तो आधीच विवाहित होता आणि चित्राच त्याची पहिली पत्नी होती. पीडित महिलेने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, संजय आधीच विवाहित होता आणि विवाह ब्युरो चालवणारी चित्रा चौधरी ही त्याची पहिली पत्नी आहे. दोघांनाही एक मुलगा आहे.






