मुरादाबाद (उत्तर प्रदेश) :- जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. येथे शनिवारी संध्याकाळपासून बेपत्ता झालेल्या १९ वर्षीय तरुणीचा मृतदेह रविवारी मैनाठेर गावाबाहेरील शेतात आढळून आला.तिचा निर्घृणपणे खून करण्यात आला आहे.
सदर तरुणीचा शवचिकित्सा अहवाल समोर आला आहे. या अहवालानुसार, तिच्या संपूर्ण शरीरावर स्क्रूड्रायव्हरने ४० हून अधिक वार केल्याचे व्रण आढळून आले आहेत. गंभीर बाब म्हणजे तिच्या गुप्तांगांवरही वार करण्यात आले आहेत. तिचा अधिक रक्तस्त्राव झाल्याने मृत्यू झाला असावा.” अशी शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
या प्रकरणी पोलिसांनी २० वर्षीय आरोपी मोहम्मद रफी याला अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणाच्या चौकशीदरम्यान २० वर्षीय आरोपी मोहम्मद रफी याने दावा केला की तो तिचा प्रियकर होता. पण ती गेल्या तीन महिन्यांपासून दुसऱ्या एका पुरुषाशी बोलत होती. यामुळे तो अस्वस्थ होता. त्याने पुढे पोलिसांना सांगितले की, पहिल्यांदा त्याने तिचा गळा दाबण्याचा प्रयत्न केला; यादरम्यान ती बेशुद्ध पडली. जेव्हा ती बेशुद्ध पडली, तेव्हा त्याने तिच्यावर निर्दयीपणे स्क्रूड्रायव्हरने वार करुन तिला भोसकले. जोपर्यंत तिचा जीव जात नाही तोपर्यंत तिच्यावर वार करत राहिला.” इतक्या क्रूरपणे तरुणीची हत्या करण्यात आली आहे. या घटनेने मुरादाबाद जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.तिच्या शवविच्छेदन अहवालात बलात्कार झाल्याचे म्हटलेले नाही. पण सुडाच्या भावनेने तरुणीच्या गुप्तांगावर स्क्रूड्रायव्हरने अनेकवेळा वार केल्याचे आढळून आले आहे. तिच्या मानेवरही खोलवर व्रण दिसून आले आहेत.
या प्रकरणातील आरोपी हा पोल्ट्री चालवत होता. त्याने पीडितेला एक मोबाइल फोन गिफ्ट दिल्याचे त्याचे म्हणणे आहे. तो तिच्याशी वर्षभर संपर्कात होता, असे मैनाठेर पोलिसांनी सांगितले. या प्रकरणी पीडितेच्या आईने तक्रार नोंदवली आहे. त्यानंतर आरोपी रफी विरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम १०३ (खून) अंतर्गत एफआयआर नोंद केले आहे.
प्रेमसंबंध ठेवण्यासाठी प्रियकराचा दबाव….
पीडितेच्या आईने तक्रारीत म्हटले आहे की, माझी मुलगी शनिवारी संध्याकाळी शेळ्यांना चारा आणायला जातो, असे सांगून घराबाहेर पडली. ती काही परत आली नाही. आम्ही तिचा शोध सुरू केला. दरम्यान, माझ्या मुलीचा मृतदेह मक्याच्या शेतात आढळून आला. तिचा खून करण्यात आला आहे. रफी माझ्या मुलीला त्रास देत होता. यामुळे त्यानेच हे कृत्य केल्याचा संशय आहे. तो तिच्यावर प्रेमसंबंध ठेवण्यासाठी दबाव आणत असे, असे मुलीच्या आईने पोलिसांसमोर सांगितले.