6 वर्षीय मुलीवर बलात्कार करून दुकानदार फरार, घटनेनंतर काही तासातच प्रशासनाने घरावर फिरवला “बुलडोझर’

Spread the love

भोपाळ – मध्य प्रदेशातील मुरैना जिल्ह्यात एका सहा वर्षांच्या मुलीवर बलात्कार झाला. घटनेनंतर आरोपी फरार झाला. याप्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी आरोपीला पकडण्यासाठी शोधाशोध केली मात्र तो सापडला नाही. त्यानंतर प्रशासनाने आरोपीच्या घरावर बुलडोझर चालवून घर जमीनदोस्त केले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मुरैना जिल्ह्यातील देवगड पोलीस स्टेशन हद्दीतील खिटोरा गावात मंगळवारी रात्री सहा वर्षीय मुलीवर बलात्कार झाला. पोलिसांनी सांगितले की, मुलगी 6 वर्षांची आहे. मंगळवारी रात्री 8.30 वाजण्याच्या सुमारास मुलगी वडिलांसाठी विडी घेण्यासाठी दुकानात गेली होती. दुकानदारने मुलीला चॉकलेटचे आमिष दाखवून पाठीमागील खोलीत नेले आणि तेथे त्याने मुलीवर बलात्कार केला. घटनेनंतर पीडित मुलगी कशीतरी रडत रडत घरी पोहोचली आणि तिने सर्व प्रकार घरच्यांना सांगितला. कुटुंबीय मुलीला घेऊन पोलीस ठाण्यात गेले. नंतर त्या निष्पाप मुलीला रुग्णालयात दाखल करण्यात आले.

मुलीचे जबाब नोंदवल्यानंतर पोलिसांनी आरोपीविरुद्ध बलात्कार आणि पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला. आरोपी दुकानदार पळून गेला होता. ही घटना उघडकीस येताच गावात एकच खळबळ उडाली. आरोपीला पकडण्यासाठी पोलिसांनी अनेक ठिकाणी छापे टाकले मात्र तो सापडला नाही. त्यानंतर बुधवारी सकाळी प्रशासनाचे पथक बुलडोझरसह आरोपीच्या घरी पोहोचले. एसडीएम आणि एसडीओपी यांच्या उपस्थितीत आरोपीच्या घरावर बुलडोझर फिरवला.

देवगड पोलिस स्टेशनचे प्रभारी सुखदेव सिंह चौहान यांनी सांगितले की, मंगळवारी संध्याकाळी आरोपीने 6 वर्षांच्या निष्पाप मुलीवर बलात्कार केल्याची घटना घडली आहे. आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून एसडीएमच्या उपस्थितीत बुलडोझर चालवून त्याचे घर जमीनदोस्त करण्याची कारवाई करण्यात आली आहे.

टीम झुंजार