पुणे जिल्ह्यावर काळाचा घाला; चासकमानमध्ये 4 विद्यार्थी तर भाटघर धरणात 5 महिलांचा बुडून मृत्यू

Spread the love

चासकमान धरणात दहावीच्या चार विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू; मृतांमध्ये दोन मुलींचा समावेश

पुणे :- चासकमान धरणाजवळील डोंगरावर असलेल्या सह्याद्री स्कुलमधील चार मुले चास कमान धरणाच्या हुतात्मा राजगुरू जलाशयात बुडाल्याची दुर्दैवी घटना आज गुरुवारी (दि.१९) सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास घडली. प्राथमिक माहितीनुसार, परिक्षीत आगरवाल,  रीतीन डीडी हे दोन मुले आणि तनिष्का देसाई, नव्व्या भोसले या दोन मुली असे दहावीत शिकणाऱ्या चार विद्यार्थ्यांचा धरणातील पाण्यात बुडून मृत्यू झाल्याचे समजते.

गुंडाळवाडी-बुरसेवाडी नजिक असलेल्या त्रिमूर्ती फौंडेशनच्या सह्याद्री स्कूलमधून आठ ते दहा मुले दुपारी चास कमानच्या हुतात्मा राजगुरू जलाशयात गेली होती. त्यातील चार मुले पाण्यात बुडाली. वास्तविक या शाळेतील मुलांना बाहेर सोडले जात नाही मात्र ही मुले बाहेर कशी आली हा प्रश्न समोर आला आहे.

यामध्ये दोन मुले आणि दोन मुलींचा बुडून मृत्यू झाला असुन त्यांचे मृतदेह पाण्यातुन सायंकाळी ७.३० वाजण्याच्या सुमारास बाहेर काढण्यात ग्रामस्थांना यश आले. प्राथमिक माहितीनुसार, परीक्षित आगरवाल, तनिषा देसाई, ऋचादिदि, नव्या भोसले हे चारही मृत मुले परराज्यातील आहेत. पोलिस पंचनामा झाल्यावर सर्व घटना समोर येणार आहे. शाळा प्रशासनाकडून माहिती देण्यास टाळाटाळ केली जात आहे.

‌भाटघर धरणात पाच महिलांचा बुडून मृत्यू; लग्नसोहळ्यासाठी आल्यानंतर दुर्घटना

तर दुसरीकडे भोर तालुक्‍यातील भाटघर धरणात बुडून पाच विवाहित महिलांचा मृत्यू झाला आहे. एका मुलीला वाचविण्यात यश आले. ही दुर्घटना (दि.19) सायंकाळी पाचच्या सुमारास घडली आहे. या पाचही जणी पुण्यातील रहिवासी आहेत. त्या पाहुण्यांकडे आल्या होत्या. त्यावेळी त्यांच्यावर काळाने झडप घातली. यापूर्वी धरणात बोट उलटून 14 जणांचा मृत्यू झाला होता. त्यानंतरची ही मोठी दुर्घटना आहे.

घटनास्थळावरून आणि पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खुशबू लंकेश रजपूत (वय 19, रा बावधन), मनीषा लखन रजपूत (वय 20), चांदनी शक्‍ती रजपूत (वय 21), पूनम संदीप रजपूत (वय 22, तिघीही रा. संतोषनगर, हडपसर पुणे) मोनिका रोहित चव्हाण (वय 23, रा नऱ्हे, पुणे), अशी मृत्यू महिलांची नावे आहेत. यातील खूशबू आणि चांदनी यांचे मृतदेह अजून मिळालेली नाहीत, उर्वरित तिघांचे मृतदेह हाती लागले आहेत.

दरम्यान, धरणात एकूण सहाजण बुडाले होते. त्यातील एक मुलगी सुदैवाने बचावली आहे. भाटघर धरणालगतच्या नऱ्हे गावच्या हद्दीत सायंकाळी दुर्घटना घडली. नऱ्हे गावातील कातकरी समाजाच्या तरुणाने तीन मृतदेह बाहेर काढले आहेत. घटनास्थळी राजगडचे पोलीस दाखल झाले आहेत. रात्री उशिरापर्यंत शोधकार्य सुरू होते.

टीम झुंजार