
वर्धा : – सध्या समाजात अंधश्रद्धेचे प्रमाण खूप वाढले आहे.अंधश्रद्धेमुळे लोकांना आपला जीव गमावला लागतोय तरी लोक सुधरायच नाव घेत नाही.अशीच एक घटना वर्धा जिल्ह्यात घडली आहे. सतत आजारी पडत असल्याने अमरावती इथला एक युवक आर्वीच्या तंत्रिकाकडे गेला होता. मानसिक आजार असलेल्या तरुणावर उपचार करत असताना तांत्रिकाने त्या तरुणाचा गळा आवळला. यात या तरुणाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना वर्ध्यात घडली आहे. या घटनेनं जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.
आर्वी येथील विठ्ठलवार्ड परिसरात हा अघोरी प्रकार १८ मे रोजी घडला. यानंतर १९ मे रोजी रात्री गणेश तुकाराम सोनकुसरे यांनी तक्रार दाखल केली. गणेश सोनकुसरे (रा. बेलपुरा, अमरावती) यांनी त्यांच्या मोठ्या मुलाला उपचारासाठी वरील तीन आरोपीकडे नेले होते. त्यांनी तांत्रिक उपचार केले. शेवटी संगनमत करीत गळा आवळून ठार केले. याबाबत पोलिसांना माहिती न देता मृतदेह फिर्यादीच्या हवाली केला. त्याची तक्रार कोतवाली अमरावती पोलीस ठाण्यात दाखल झाली. त्यानुसार आर्वी पोलिसांनी कारवाई केली आहे.
नेमकी घटना काय?
अमरावतीमध्ये राहाणारा एक तरुण वर्धा जिल्ह्यातल्या आर्वी शहरात उपचारासाठी आला होता. मानसिक आजारावर हमखास उपचार होतील असा दावा या तांत्रिकाने केला होता. याची माहिती अमरावतीतल्या रितीक सोंनकुसरे या तरुणाच्या कानावर आली. रितीक मानसिक आजाराने त्रस्त होता.
मानसिक आजारावर डॉक्टरकडे उपचार करण्याऐवजी हा तरुण वर्ध्यातल्या तांत्रिकाकडे आला. आर्वीच्या विठ्ठल वॉर्डात राहणारे अब्दुल रहिम अब्दुल मजीद, अब्दुल जुनैद, आणि अब्दुल जमीर हे तिघं आपण तांत्रिक असल्याचा दावा करत होते. रितीकने या तिघाकंडे उपचार सुरु केले. पण उपचाराच्या नावाखाली तांत्रिकांकडून अक्षरश: अघोरी प्रकार सुरु झाले.
उपचाराच्या नावाखाली एका तांत्रिकाने रितीकचा चक्क गळा आवळला. यातच रितीकचा मृत्यू झाला. धक्कादायक म्हणजे रितीकचा मृत्यू झाल्यानंतर याची माहिती पोलिसांना न देता तांत्रिकांनी रितीकचा मृतदेह थेट अमरावतीत त्यांच्या कुटुंबियांकडे पाठवून दिला. पुरावा नष्ट करण्याचाही प्रयत्न करण्यात आला.
याप्रकरणी कोतवाली पोलिसांनी गुन्हा दाखल करत तिनही आरोपींना अटक केली आहे. आर्वी उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील सोळुंके म्हणाले, “तिन्ही आरोपींना न्यायालयात हजर करण्यासाठी नेण्यात आले आहे. पीएम रिपोर्टमध्ये गळा आवळल्याच्या खुणा दिसून येत आहेत. हे गंभीर प्रकरण असून कसोशीने चौकशी होत आहे.”
“मांत्रिकांची सखोल चौकशी करणे आवश्यक”
अखील भारतीय अंनिसचे राज्य संघटक पंकज वंजारे म्हणाले, “या घटनेतील बाबा, मांत्रिकांची सखोल चौकशी करणे आवश्यक आहे. चौकशीत आणखी धक्कादायक माहिती पुढे येऊ शकते. यात अंनिसचे संपूर्ण सहकार्य असेल. भविष्यातील अंधश्रध्दांचे बळी थांबतील.”





