
‘सासऱ्यांच्या टोमणेने मी हैराण झाली आहे. माझ्यावर अंत्यसंस्कार माझ्या लहानपणाच्या गावातच करा. विवाहिताप्रमाणे माझ्यावर अंत्यसंस्कार करू नका. विवाहितेचे प्रतीक असलेल्या प्रत्येक वस्तू अंत्यसंस्कारापासून दूर ठेवा’ अशी पाच पानी सुसाईट नोट लिहून २५ वर्षीय विवाहितेने आत्महत्या केली. ही घटना हरियाणाची सायबर सिटी गुडगावच्या कार्टरपुरी गावात घडली.
रितूचा भाऊ कुलदीपने सांगितले की, १८ फेब्रुवारीला रितूचे लग्न दिल्लीतील दरियापूर खुर्द येथील चेतनसोबत झाले होते. बहिणीला एमबीए केल्यानंतर नोकरी करायची होती. परंतु, सासरच्या मंडळींना ते आवडत नव्हते. बहिणीचा नवरा चेतन, जेठ कुलदीप, जेठानी शोभा आणि सासू रमेश देवी हे हुंड्यासाठी छळ करीत होते. यामुळे तिला आत्महत्या करावी लागली.
रितूचे तीन महिन्यांपूर्वीच लग्न झाल्याचे नातेवाइकांचे म्हणणे आहे. लग्नात आम्ही आमच्या अयपतीपेक्षा जास्त हुंडा दिला होता. तरीही छोट्या छोट्या गोष्टींवरून सासरचे लोक तिला हुंड्यासाठी त्रास देत होते. रितूला समजावून सांगायचो की काही दिवसांनी सर्व काही ठीक होईल. परंतु, सासरच्या टोमण्यांना कंटाळून ती आत्महत्या करेल याचा विचार आम्ही केला नव्हता, असे रितूच्या नातेवाइकांनी सांगितले.
हातावर पण लिहिली नोट
रितूने आत्महत्या करण्यापूर्वी हातावर सुसाईड नोट लिहिली होती. आत्महत्येसाठी तिने सासरच्या मंडळींना जबाबदार धरले आहे. सुसाईड नोटमध्ये तिने ‘सासरच्या लोकांनी माझे तोंडही पाहू नये’ अशी शेवटची इच्छा लिहिली आहे. कुलदीपच्या तक्रारीवरून गुरुग्रामच्या पालम विहार पोलिस ठाण्यामध्ये सासरच्या लोकांविरुद्ध हुंड्यासाठी छळ व आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करीत आहे.





