दहा वेळेस रिक्षा, दोनदा कपडे बदलले तरीही दागिने चोरणाऱ्या बहिणी जेरबंद; पुण्यातून घेतले पदव्युत्तर शिक्षण

Spread the love

औरंगाबाद : – सध्या चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत आहे अश्यातच औरंगाबादमध्ये चोरीच्या घटना समोर आली आहे पुण्याच्या नामवंत शिक्षण संस्थेतून पदव्युत्तरचे शिक्षण घेतले. लग्नानंतर पतीसोबत रोजाबाग परिसरातील आलिशान वसाहतीत मुलाबाळांसह राहायला लागली. मात्र, झटपट पैसे कमावण्याच्या लालसेने बुशरा परवीन शेख नईम (३५) हिने संजयनगरातील सावत्र बहीण मुन्नी बेगम हुसेन खान (३०) हिच्यासोबत मिळून शहरातील बड्या ज्वेलरी शॉपमध्ये लूटमार सुरू केली. रिलायन्स मॉलमध्ये १९ मे रोजी दोन सोन्याच्या बांगड्या चोरल्यानंतर गुन्हे शाखेने कसून शोध घेत या दोन सावत्र बहिणींना अटक केली. या बहिणी सीसीटीव्ही फुटेजमध्ये अडकू नयेत म्हणून चोरी केल्यानंतर घरी जाईपर्यंत आठ ते दहा वेळेला रिक्षा बदलून रस्त्यात मिळेल तेथे कपडे बदलत होत्या.

गजानन महाराज मंदिर रस्त्यावर असलेल्या मोठ्या दालनातून दोन महिलांनी दागिने खरेदी करण्याच्या बहाण्याने अडीच तोळे सोन्याच्या बांगड्या लंपास केल्याची घटना १९ मे रोजी घडली होती. दुपारी ४ वाजता तोंडाला स्कार्फ बांधलेल्या दोन महिलांनी दालनात सोन्याच्या बांगड्या दाखवण्याची विनंती केली. कर्मचारी योगेंद्र शेळके हे बांगड्या दाखवत असतानाच एकीने त्यांना गप्पात गुंतवून ठेवले, तर दुसरीने हातचलाखीने अडीच तोळ्याच्या सोन्याच्या बांगड्या लंपास केल्या होत्या. गुन्हा दाखल होताच पोलिसांनी सखोल तपास सुरू केला होता.

मुलाला घ्यायला बोलावले अन् अडकली

बुशरा रोजाबाग परिसरातील आलिशान ग्रीन व्हॅलीत राहते. तिने अलीकडेच रिक्षा थांबवली व मुलाला घेण्यासाठी बोलावले. जवळपास ७५ कॅमेरे तपासत पोलिस तिच्या मागावर होते. शेवटच्या कॅमेऱ्यात मुलाच्या गाडीवर बसून जाताना त्यांना महिला दिसली. सहायक निरीक्षक मनोज शिंदे यांनी तत्काळ मुलाचा शोध घेत महिलेच्या घरी छापा टाकला. तेव्हा तिने आरडाओरड सुरू केला. मात्र, महिला पोलिसांनी घराची झाडाझडती घेताच चोरी करताना परिधान केलेले कपडे मिळाले व बुशरा शांत झाली. संजयनगरातील तीन मजली घरात राहणारी सावत्र बहीण मुन्नीसोबत मिळून गुन्हा केल्याचे कबूल केले. रिलायन्समधून चोरलेल्या सोन्याची सोनारामार्फत लगड करवून घेतली होती. ती पोलिसांनी जप्त केली. जवाहरनगरातील सावंत सराफामधून चोरलेले सोने किराडपुऱ्यातील जिना ज्वेलर्सला विकल्याचे सांगितले. तसेच समर्थनगर व रामगिरी येथील दोन बड्या दालनातील चोरींमध्ये दोघींचा सहभाग असल्याचा संशय पोलिसांना आहे.

७५ सीसीटीव्हींचे फुटेज तपासले

गुन्हे शाखेचे निरीक्षक अविनाश आघाव, सहायक निरीक्षक मनोज शिंदे यांनी गांभीर्याने तपास सुरू केला. जवळपास ७५ सीसीटीव्हींचे फुटेज तपासले. मात्र, अनेकदा काही कॅमेऱ्यात दिसणाऱ्या महिला पुढील कॅमेऱ्यात मात्र दिसत नव्हत्या.

बारकाईने पाहणी केली असता एकाच शरीरयष्टीच्या दोन महिला वेगवेगळ्या प्रकारे काही अंतराने रिक्षा बदलत असल्याचे लक्षात आले. मग त्या अनुषंगाने तपास सुरू केला असता रिलायन्स मॉलमधून निघून महिला पोदार शाळेजवळ उतरल्या. त्याच्या विरुद्ध दिशेच्या अपार्टमेंटमध्ये गेल्याचे कैद झाले. तेथे त्यांनी बुरखा परिधान करून दुसऱ्या रिक्षात बसल्या.

त्याच कपड्यांमध्ये पोलिसांना दिसू नये म्हणून त्यांनी रस्त्यात कपडे बदलले. त्यानंतर रोजाबाग येईपर्यंत बुशराने तब्बल सहा वेळा रिक्षा बदलली. विशेष म्हणजे पुण्यात राहिल्याने ती अस्खलित मराठी बोलते.

पतीचे पैठण गेटवर कपड्याचे दुकान, दुसरीचा पती खुनाच्या गुन्ह्यात जेलमध्ये

बुशराच्या वडिलांनी दोन लग्ने केली असून मुन्नी तिची सावत्र बहीण आहे. पतीचे पैठण गेट येथे कपड्याचे दुकान आहे. मुन्नीचा पती बाली याने काही महिन्यांपूर्वी जिन्सी परिसरात एका वाळू ठेकेदाराचा खून केला होता. त्या प्रकरणात तो सध्या हर्सल कारागृहात शिक्षा भोगत आहे. ही कारवाई शिंदे यांच्यासह उपनिरीक्षक अजित दगडखैर, अंमलदार सतीश जाधव, रमेश गायकवाड, दत्तात्रय गाडेकर, भगवान शिलोटे, राजेंद्र साळुंके, विशाल पाटील, विलास मुठे, नितीन धुळे, मोहिनी चिंचोळकर, हिरा चिंचोळकर, गीता ढाकणे, प्रीती इलग यांनी केली.

टीम झुंजार