
सूर्यप्रकाशानंतर मासे आणि दुग्धजन्य पदार्थ हे व्हिटॅमिन डीचे सर्वोत्तम स्त्रोत मानले जातात, परंतु एडिटिंग टेक्नोलॉजीच्या मदतीने आता टोमॅटोसुद्धा या पोषक तत्वाचा मोठा स्रोत बनणार आहे. खरं तर, इंग्लंडमधील जॉन इनेस सेंटरच्या शास्त्रज्ञांनी वनस्पती-आधारित आहार घेणाऱ्या लोकांसाठी हा विशेष शोध लावला आहे.
जगभरात 100 कोटी लोक व्हिटॅमिन डीच्या कमतरतेने त्रस्त आहेत. हृदयविकारापासून कर्करोगापर्यंत अनेक गंभीर आजारांना हे कारणीभूत आहे. एका अभ्यासानुसार, भारतातील सुमारे 76% लोक व्हिटॅमिन डीच्या कमतरतेचे बळी आहेत.

टोमॅटोच्या जेनेटिक कोडमध्ये केला बदल
शास्त्रज्ञांनी CRISPR तंत्रज्ञानाचा वापर करून व्हिटॅमिन डी समृद्ध टोमॅटो बनवले. याद्वारे, संशोधक कोणत्याही गोष्टीचा अनुवांशिक कोड बदलण्यास सक्षम आहेत. CRISPR टूलच्या मदतीने, शास्त्रज्ञांनी टोमॅटोच्या जीनोम रचनेत असे बदल केले, ज्यामुळे टोमॅटो आणि त्याच्या पानांमध्ये 7-DHC घटक जमा होऊ लागले. हा घटक टोमॅटोच्या पानांमध्ये नैसर्गिकरित्या आढळतो आणि व्हिटॅमिन D3 तयार करण्यासाठी वापरला जातो. व्हिटॅमिन D3 उत्तम प्रकारे व्हिटॅमिन डीची पातळी वाढवते.
1 टोमॅटोमध्ये बनले 2 अंड्याएवढे व्हिटॅमिन D
शास्त्रज्ञांनी टोमॅटो आणि त्याची पाने एका तासासाठी अल्ट्राव्हायोलेट (UV) प्रकाशात आणली. परिणामांनुसार, टोमॅटोमध्ये 2 अंडी किंवा 28 ग्रॅम टूना माशांच्या बरोबरीने व्हिटॅमिन D आढळले. हे संशोधन जर्नल नेचर प्लांट्समध्ये प्रसिद्ध झाले आहे.
सूर्यप्रकाशातही संशोधन केले जाईल
संशोधनात सहभागी शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे की, बदललेल्या टोमॅटोवर UV प्रकाशाऐवजी नैसर्गिक सूर्यप्रकाशाचा परिणामही पाहण्यात येईल. त्यासाठी हे टोमॅटो आता बाहेर सूर्यप्रकाशातच पिकवले जाणार आहेत. यावरून त्यांच्यामध्ये असलेले 7-DHC व्हिटॅमिन डी3 मध्ये रूपांतरित होत आहे की नाही हे समजेल. अलीकडेच ब्रिटिश संसदेत जनुक-संपादित पिकांच्या चाचणीबाबत एक विधेयक मंजूर करण्यात आले आहे.
इतर भाज्यांवरही एक्स्पेरिमेंट होणार
संशोधकांच्या मते, नवीन तंत्रज्ञान सिमला मिरची, वांगी, मिरची, बटाटा आणि मशरूमवर देखील वापरले जाऊ शकते. याद्वारे या भाज्या व्हिटॅमिन डीचाही चांगला स्रोत बनतील. याचा सर्वाधिक फायदा शाकाहारी लोकांना होईल. खरं तर, व्हिटॅमिन डी सप्लीमेंट्सचा मुख्य स्त्रोत लॅनोलिन आहे, जो मेंढीच्या लोकरीपासून मिळतो. जे शाकाहारी आहारा घेतात ते याचे सेवन करू शकत नाहीत.





