
कासोदा प्रतिनिधी
कासोदा :- येथील युनियन बँकेचे एटीएम मशिन गॅस कटरच्या सहाय्याने कापून त्यात असलेले ९ लाख ५५ हजार रुपयांची रोकड दि.३१ मे व १ जून च्या मध्यरात्री दिड ते साडेचार वाजेदरम्यान चोरट्यांनी लंपास केल्याची घटना घडली.

येथील बिर्ला चौक परिसरात गेल्या अनेक वर्षांपासून असलेल्या युनियन बँकेच एटीएम मशिन ३१ मे २०२२ ते १ जून २०२२ च्या मध्यरात्री दरम्यान अज्ञात चोरट्यांनी गॅस कटरच्या सहाय्याने एटीएम मशिन कापून त्यातील ९ लाख ५५ हजार रुपये चोरून त्याच्यासोबत असलेल्या चारचाकी वाहनातून पोबारा केला. याबाबत कासोदा पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात दिपक दौलत तिवारी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
पोलीस अधीक्षक प्रवीण मुंडे यांच्या सोबत अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे चाळीसगाव, पाचोरा उपविभागीय पोलीस उपअधीक्षक काकडे , स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बकाले तसेच सपोनि निता कायटे यांनी घटनास्थळी भेट देऊन मार्गदर्शन केले.
सदर चोरीचा तपास व्हावा या उद्देशाने जंजीर या श्वानास पाचारण करण्यात आले परंतु सदर एटीएम हे गॅसने कापले असल्याने जंजीर या श्वानास कोणताही मार्ग दाखवता आला नाही. याठिकाणी ठसे तज्ञांना देखील बोलवण्यात आले होते.
नोटा जळाल्याचा अंदाज
सदर चोरीत एटीएम मशिन हे गॅस कटरच्या सहाय्याने कापण्यात आले असल्याने त्यात असलेले नोटा त्यामुळे जळाल्या असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे एटीएमच्या बाहेर २ हजारांची एक नोट आढळून आल्याचे सांगण्यात आले आहे.
पोलीसांच्या गस्तीवर प्रश्नचिन्ह
गावात व परिसरात कासोदा पोलीसांची गस्त रात्रभर सुरु असते परंतु पोलीस गस्तीवर असतांना देखील मोक्याच्या ठिकाणी चोरी होत असल्याची घटना एक वेळेस नाही तर या पहिले देखील घडल्याने पोलिसांच्या गस्तीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत असल्याची चर्चा सुरु आहे.
पोलीसांबाबत देखील उलटसुलट चर्चा
सदर परिसरात दोन एटीएम असल्यावर देखील या ठिकाणी कोणताही पोलीस कर्मचारी किंवा दोन्ही एटीएम धारकांकडून सुरक्षा रक्षक तैनात करण्यात आलेला नाही जर दोघांपैकी कोणीही एक तैनात राहिला असता तर ही चोरीची घटना घडलीच नसती.संतप्त प्रतिक्रिया त्या ठिकाणी ग्रामस्थांकडून उमटत होत्या. या अगोदर देखील लहानमोठ्या बऱ्याच चोऱ्या झाल्या असून त्याचा अद्याप कोणताही तपास लागलेला नसल्याने सदर चोरीचा तपास लागेल किंवा नाही याबाबत ग्रामस्थांमध्ये साशंकता निर्माण होतांना दिसून आली.
या पूर्वी देखील अनेक चोऱ्या झाल्या! मात्र तपास कोणत्याही चोरीच्या लागला नाही?
या आगोदर देखील मोठ्या घरफोड्या झाल्या असून दि. २५ ऑगस्ट २०२० मध्ये मुकुंद अंबादास कुळकर्णी यांच्याकडे ८ लाख रुपयांची चोरी झाली होती. तर दि. ६ जानेवारी २०२२ रोजी भडगाव रोडावरील स्वामी समर्थ केंद्रातून दानपेटीतील व साहीत्य विक्रीची रक्कम तसेच येथील विश्रामनगरमधील विलास पाटील व समाधान पाटील यांच्या देखील घरात त्याच दिवशी चोरी झाल्याची घटना घडली आहे त्याचा शोध अजूनही लागला नाही. तसेच दि. १२ फेब्रुवारी २०२२ रोजी दामू कुंभार यांच्याकडे देखील बिर्ला चौक परिसरात चोरी झाल्याची नोंद पोलीसात आहे.





