
जनतेच्या प्रेमातून उतराई होण्याचे काम कार्यांमधून देत राहणार : ना.गुलाबराव पाटील

झुंजार । प्रतिनिधी
एरंडोल :- नदीचा कितीही विस्तार झाला तरी ती उगम विसरत नाही. यामुळे राजकीय कारकिर्दीत कितीही पुढे गेलो तरी जेथून आपली सुरूवात झाली त्या कासोद्याला आपण कधीही अंतर देणार नाही. याच बिर्ला चौकातील अनेक सभांनी मला पुढे जाण्याची प्रेरणा दिली आहे. कासोदेकरांनी माझ्यावर भरभरून प्रेम केले. आणि या प्रेमाच्या ऋणातून उतराई होण्यासाठी आपण सातत्याने कामे केली असून भविष्यातही करतच राहणार असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी केले.
कासोदा येथे कृषी रत्न व उच्च शिक्षितांचा सत्कार आणि ना. पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजीत करण्यात आलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. याप्रसंगी परिसरातील प्रगतीशील शेतकरी आणि गुणवंतांच्या सन्मानासह ना. गुलाबराव पाटील यांचा हृद्य सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून कासोदा येथील सरपंच तथा शिवसेना शहरप्रमुख महेश पांडे आणि उपतालुका प्रमुख रवींद्र चौधरी यांनी शहरातील बिर्ला चौकात भव्य कार्यक्रमाचे आयोजन केले. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून शिवसेना सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ, आमदार चिमणराव पाटील, आमदार किशोरआप्पा पाटील, शिवसेना जिल्हाप्रमुख डॉ. हर्षल माने, जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, महानगर प्रमुख शरद तायडे, माजी जिल्हा परिषद सदस्य नानाभाऊ महाजन, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष ज्ञानेश्वर आमले, हिंमतबापू पाटील, , पाचोर्याचे माजी नगराध्यक्ष संजय गोहील,समन्वय समितीचे अध्यक्ष रमेशआण्णा महाजन,तालुका प्रमुख वासुदेव पाटील, एरंडोलचे माजी नगराध्यक्ष किशोर निंबाळकर, राजू आबा चौधरी, माजी पं.स. सभापती अनिल महाजन, बंटी चौधरी, अमोल भोई, दगडू चौधरी, अमोल पैलवान आदी मान्यवरांची उपस्थिती होती.


पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांचे आगमन होताच फटाक्यांच्या प्रचंड आतषबाजीत त्यांचे स्वागत करण्यात आले. कासोदेकरांच्या वतीने पालकमंत्र्यांचे अभिष्टचिंतन करण्यात आले. तसेच वाढदिवसानिमित्त केक कापण्यात आला. याप्रसंगी परिसरातील 56 प्रगतीशील शेतकर्यांसह 23 उच्च शिक्षीत गुणवंतांचा हृद्य सत्कार करण्यात आला. तर याप्रसंगी वैभव महाजन यांनी ना. गुलाबराव पाटील यांच्या जीवनावरील भाऊ या कवितेचे वाचन केले असता याला उपस्थितांनी भरभरून दाद दिली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिवसेना शहरप्रमुख तथा कासोदा येथील सरपंच महेश पांडे यांनी केले. ते म्हणाले की, भाऊंचे कासोदा येथे जुने ऋणानुबंध असून शहराच्या विकासासाठी त्यांनी 11 कोटी रूपयांची पाणी पुरवठा योजना मंजूर केलेली आहे. या योजनेसाठी फिल्टरची मागणी त्यांनी केली असता पालकमंत्र्यांनी तातडीने याला मंजुरी दिली. . शिवसेना सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ आणि जिल्हाप्रमुख डॉ. हर्षल माने यांनी पालकमंत्र्यांच्या विकासाभिमुख वाटचालीचे मन भरून कौतुक केले. आमदार किशोरआप्पा पाटील यांनी ना. गुलाबराव पाटील यांच्या माध्यमातून जिल्ह्यास एक अतिशय कार्यक्षम आणि कामांना प्राधान्य देणारा पालकमंत्री लाभला असल्याचे प्रतिपादन केले. भाऊंच्या माध्यमातून जिल्ह्यातील पाणी पुरवठा योजनांना प्रचंड गती आली असून येत्या तीन वर्षात जिल्ह्यातील सर्व पाणी पुरवठा योजना पूर्ण होतील असा आशावाद व्यक्त केला. भाऊ हे आज मंत्री असले तरी ते पहिल्यांदा शिवसैनिक आहेत. खरं तर सिमेवर देशाचे रक्षण करणारा सैनिक आणि जनतेच्या हितासाठी लढणारा शिवसैनिक या दोघांवर त्यांचे अतोनात प्रेम आहे. जिल्ह्यात त्यांच्या नेतृत्वाखाली विकासाचे नवीन पर्व सुरू झाल्याचे त्यांनी आवर्जून नमूद केले.


जनतेच्या प्रेमाची श्रीमंती : आ. चिमणराव पाटील
आमदार चिमणराव पाटील यांनी आपल्या भाषणातून ना. गुलाबराव पाटील यांच्या कार्याचा गौरव केला. ते म्हणाले की, भाऊंची आजवरची वाटचाल ही खूप प्रेरणादायी अशीच आहे. यामुळे भाऊंवर जीवनपट तयार होऊ शकतो. त्यांची ही स्वकर्तृत्वाच्या वाटचालीची प्रेरणा नवीन पिढींना आदर्शवत अशीच आहे. पालकमंत्री म्हणून त्यांनी जळगाव जिल्ह्यात एक मापदंड प्रस्थापित केला आहे. विकासकामांमध्ये कोणताही भेदभाव निर्माण न करता त्यांनी केलेली कामे पाहता ते यशस्वी पालमंत्री ठरले आहेत. सर्वात महत्वाचे म्हणजे त्यांना जनतेचे अलोट प्रेम लाभले असून त्यांची ही श्रीमंती अतिशय कौतुकास्पद अशीच असल्याचे प्रतिपादन आ. चिमणराव पाटील यांनी केले.



प्रेमाने भारावलो : ना. गुलाबराव पाटील
पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी सत्कारला उत्तर देतांना आपण कासोदेकरांच्या प्रेमाने भारावलो असल्याचे नमूद केले. ते म्हणाले की, येथूनच माझी सुरूवात झालेली आहे. आणि हे शहर अजून देखील माझ्या हृदयात आहे. या गावाच्या विकासासाठी सर्वतोपरी मदत करण्यसाठी मी कटीबध्द आहे. येथे आधीच अकरा कोटींची पाणी पुरवठा योजना मंजूर करण्यात आली असून याला फिल्टरदेखील आता लावण्यात येणार आहे. तसेच कासोदा शहराच्या विविध विकासकामांसाठी जिल्हा नियोजन मंडळाच्या माध्यमातून दोन कोटी रूपयांचा निधी मंजूर करण्यात येत असल्याची घोषणा देखील ना. गुलाबराव पाटील यांनी केली.
ना. गुलाबराव पाटील पुढे म्हणाले की, जिल्ह्यातील कुणीही व्यक्त तहानलेला राहू नये यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. याचमुळे माझी पाणीवाला बाबा म्हणून ओळख होत असून ही आपल्या कामाची पावती असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले. तर आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होत असून यात शिवसेनेला यश मिळवून देण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत असे आवाहन देखील पालकमंत्र्यांनी केले.
या कार्यक्रमाला परिसरातील सरपंच, उपसरपंच, विकासो संचालक आदींसह शिवसेना व युवसेनेचे पदाधिकारी तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सरपंच महेश पांडे यांनी केले. तर आभार उपशहर प्रमुख रवींद्र चौधरी यांनी मानले.





