
झुंजार प्रतिनिधी – संतोष कदम.
वालचंद नगर : ( ता. इंदापूर ) श्री वर्धमान विद्यालय वालचंदनगर ही पुणे जिल्ह्यातील एक नामांकित शाळा आहे. कोवीड 19 च्या संकटामुळे दहावीचा अभ्यासक्रम ऑनलाईन व ऑफलाईन पद्धतीने शिकवावे लागले. विद्यालयातील शिक्षकांनी दोन्ही पद्धतीने पाठ्यक्रम शिकवण्यासाठी खूप मेहनत घेतली. या घेतलेल्या मेहनतीमुळे विद्यालयाचा निकाल 97.26 टक्के लागला आहे.
कोरोनामुळे विद्यार्थ्यांचे अभ्यासाचे गणित कोलमडले होते परंतु विद्यार्थ्यांनी सदर परिस्थिती योग्यरीत्या हाताळून बोर्ड परीक्षेचा कसून अभ्यास केला. याचेच फलित म्हणून श्रुती लावंड हिने 94.80 टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक, अस्मिता पानसरे हिने 94.60 टक्के गुण मिळवून द्वितीय क्रमांक तर तन्वी धापटे हिने 93.20 टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांक पटकावला. या शैक्षणिक वर्षांमध्ये परीक्षेसाठी 183 विद्यार्थी बसले होते पैकी 60 मुलांना डिस्टिंक्शन व 72 मुले फर्स्ट क्लास मध्ये पास झाले आहेत. अस्मिता पानसरे हिने संस्कृत विषयात 100 पैकी 100 गुण मिळवण्याचा पराक्रम केला आहे.
बोर्ड परीक्षेमध्ये उत्कृष्ट यश मिळाल्याबद्दल शाळा समिती अध्यक्ष अमोल गेंगजे यांनी समाधान व्यक्त करून विद्यार्थ्यांचे व शिक्षकांचे कौतुक केले. वालचंद नगर इंडस्ट्रीज लिमिटेड चे एमडी अँड सीईओ श्रीमान शेठ चिराग दोशी यांनी विशेष दखल घेऊन विद्यार्थी व शिक्षकांचे कौतुक करून पुढील वर्षी शंभर टक्के निकाल लावण्यासाठी प्रयत्न करा असे ध्येय ठरवून दिले.
प्राचार्य हनुमंत कुंभार, उपमुख्याध्यापक बाळासाहेब पडारी, उपप्राचार्य अरुण निकम, पर्यवेक्षक काशिनाथ हिरवे, माणिक पिसे, शिक्षक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.





