किरकोळ कारणावरून केलेल्या मारहाणीत दोन जखमी.सात संशयितां विरोधात गुन्हा दाखल

Spread the love

झुंजार । प्रतिनिधी

एरंडोल- माती हळू टाक या किरकोळ कारणावरून पाताळनगरी भागात सात संशयितांनी लोखंडी सळईने मारहाण केल्यामुळे दोन जण गंभीर जखमी झाले.यावेळी सातही संशयितांनी जखमी झालेल्या नागरिकाच्या घरावर दगडफेक करून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला.दरम्यान एका गटाकडून मारहाण झाल्याची घटना नागरिकांना समजताच संतप्त झालेल्या युवकांनी ग्रामीण रुग्णालय आणि पोलीस स्थानक परिसरात गर्दी केल्यामुळे शहरात तणावाची परीस्थिती निर्माण झाली आहे.दरम्यान शांततापूर्ण असलेल्या शहरात काही समाजकंटक शांतता भंग करण्याचा प्रयत्न करीत असून अशा समाजकंटकांविरोधात कडक कारवाई करावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

याबाबत माहिती अशी,की पाताळनगरी भिकन पंडित सूर्यवंशी हे पत्नी सुनंदाबाई सूर्यवंशी,मुलगा भूषण सूर्यवंशी आणि निलेश सूर्यवंशी हे रात्री साडेसात वाजेच्या सुमारास घरात जेवण करीत होते.त्यावेळी सोहेलअली सलीमअली हा शेजारील पडक्या घरातील माती उचलून सूर्यवंशी यांच्या घराजवळ टाकत होता.त्यामुळे सर्वत्र मातीचा धुराळा उडत असल्यामुळे निलेश सूर्यवंशी यांनी सोहेलअली यास आम्ही चतुर्थीचा उपवास सोडत असून घरात मातीचा धुरळा येत आहे तरी माती हळू टाक असे सांगितले.त्यावेळी सोहेलअली याने मी माती हळू टाकणार नाही,तुमच्याकडून जे होईल ते करा असे बोलून शिवीगाळ करू लागला.त्याचवेळी जमाशेरखान हिदायतखान,अकीलखान रशिदखान,दानिशखान जमशेरखान,साहिलअली सलीम अली यांनी त्याठिकाणी येऊन निखील यास शिवीगाळ करण्यास सुरुवात केली.घरात जेवण करत असलेले निलेश सूर्यवंशी हे घराबाहेर आले असता त्यांनी समजावण्याचा प्रयत्न केला.मात्र साहिलअली याने त्याच्याजवळ असलेल्या लोखंडी सळईने भिकन सूर्यवंशी आणि भूषण सूर्यवंशी यांना मारहाण करण्यास सुरुवात केली.

तसेच वरील पाचही संशयितांसह नाफिसाबी सलीमअली,नसरीनबी अकिल खान यांनी सूर्यवंशी यांच्या घरावर दगडफेक करून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला.सर्व संशयितांनी केलेल्या हाणामारीत भूषण सूर्यवंशी आणि भिका सूर्यवंशी हे जखमी झाले.मारहाण सुरु असतांना पप्पू चौधरी,गोपाल जगताप,प्रकाश तेलंगे,राहुल महाजन यांनी जखमी सूर्यवंशी याना सोडवले त्याचवेळी सर्व मारहाण आणि दगडफेक करणा-या संशयितांनी त्या ठिकाणाहून पळ काढला.मारहाणीत जखमी झालेल्या दोघांवर ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात आले.

याबाबत निलेश सूर्यवंशी यांनी दिलेल्या तक्रारीवरून सोहेलअली सलीम अली,जमशेरखान हिदायतखान,अकिलखान रशीदखान,दानिशखान समशेरखान.साहिलअली सलीम अली,नफिसाबी सलीम अली,नसरीनबी अकिलखान यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलिसांनी सर्व संशयिताना अटक केली.दरम्यान मारहाण झाल्याची घटना नागरिकांना कळताच संतप्त झालेल्या युवकांनी ग्रामीण रुग्णालय आणि पोलीस स्थानकाकडे धाव घेतली.मारहाण करून दहशत निर्माण करणा-या सर्व संशयितांविरोधात कडक कारवाई करण्याची मागणी संतप्त नागरिकांनी केली.

समन्वय समितीचे अध्यक्ष रमेश महाजन,माजी नगराध्यक्ष किशोर निंबाळकर,माजी नगरसेवक जगदीश ठाकूर,सुरेश खुरे यांचेसह विविध पदाधिका-यांनी संतप्त युवकांची समजूत काढली आणि कोणताही वाद निर्माण होणार नाही याची दक्षता घेण्याचे आवाहन केले.दरम्यान शहरात आठ दिवसात असे अनेक प्रकार घडले असून काही समाजकंटक शहरातील शांतता भंग करण्याचा प्रयत्न करीत असल्याची संतप्त प्रतिक्रिया नागरिकांमध्ये व्यक्त केल्या जात आहेत.शहरात वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करणा-यांविरुद्ध पोलिसांनी कडक कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

 

टीम झुंजार